Wednesday, May 27

Hunger strike : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुन्नाभाऊ शिंदे व बालाजी ढोणे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले.

बुधवारी उपोषणस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सरोजताई देशमुख यांनी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी दिनेश रावते, राम पतंगे, विलास वानखेडे, उदय देशपांडे यांच्यासह मराठा व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाल्या, “महाराजांची जयंती असल्याने आम्ही संयम बाळगला आहे; मात्र तात्काळ जागा निश्चित न झाल्यास उपोषणाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करावे लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील.” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

प्रशासनाने केवळ तोंडी आश्वासन न देता लेखी आश्वासन द्यावे, तसेच तातडीने प्रस्ताव तयार करून तहसीलदार, एसडीएम व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दि. १० ऑगस्ट २०२३ पासून पुतळ्यासाठी जागेची मागणी प्रलंबित असून, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “अठरा पगड जातीतील समाज बांधवांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका; शिवरायांच्या जयंतीपूर्वी हा प्रश्न निकाली काढा,” असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला केले आहे. दरम्यान, या संवेदनशील विषयावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण हिमायतनगर शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!