हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड जनमताच्या आधारे होणार असून, कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात मतदार यादी तपासणी करावी. प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधून आवश्यक हरकती दाखल कराव्यात, आणि एक एक मत जोडण्यावर भर द्यावा. असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.


हिमायतनगर येथील श्री साई मंदिराच्या परिसरात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि आगामी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते, प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर याशिवाय स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आढावा बैठकीच्या वेळी अनेक इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांसह बैठकीला उपस्थिती लावली होती. तिकीटवाटप आणि संघटनशक्ती यावर चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकांची निवड होणार असून, यासाठी प्रत्येक प्रभागाचा अभ्यास, बूथलेव्हल नियोजन आणि कार्यकर्त्यांची बांधिलकी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.



शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे आवश्यक असून, शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकारकडून मदतीचा फोल दिखावा केला जात असल्याची टीका करण्यात आली. कर्जमाफीसाठी चालढकल, नुकसानीबाबत दुर्लक्ष आणि धर्मवाद-जातीवादाचा वापर करून दिशाभूल केल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर यांनी केला.

मतभेद विसरून एकजुटीवर भर उमेदवारी न मिळाल्यास नाराजी न करता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करावे, आरक्षण न पाहता “आपला माणूस जिंकला पाहिजे” हा विचार ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत “खोटं बोल, रेटून बोल” या पद्धतीने सध्याचे सत्ताधारी काम करत असून, केवळ घोषणाबाजी आणि दिखावा सुरू असल्याची टीका केली. मागील शासनकाळात मंजूर झालेली कामेच आजही सुरु असल्याची आठवण करून देत लोकांना भ्रमात न राहण्याचं आवाहन केलं.

तसेच इच्छुकांनी जनतेच्या संपर्कात राहावे समस्या पुढे आणाव आणि यद्यमध्ये होणाऱ्या घोळ तपासून हरकती दाखल करण्याबरोबर बूथस्ट्रेंथ मजबूत करा. मतदारांच्या याद्या तपासून एक एक मत मिळवा. आपसातील मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसला विजय करण्यासाठी सर्वानी प्रामाणिक कार्य करावे असे आवाहन उपस्थितांना केलं. एकूणच आजच्या बैठकीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, रणसज्जतेचा संदेश मजबूत पद्धतीने देण्यात आल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. यावेळी हजारोच्या संख्येने इच्छुक उमेदवार, काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

