देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील मौजे शहापूर ग्रामपंचायत कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदाची ग्रामसभा खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडली.


ग्रामसभेच्या प्रारंभी मागील ग्रामसभेत झालेल्या कामांचे वाचन ग्रामसेवकांनी केले. त्यानंतर शहापूर परिसरातील वीस पादन रस्ते करण्याचा ठराव तलाठी कदम यांनी मांडला, ज्याला शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. गावातील मुख्य रस्त्यावर रोषणाई करण्यासाठी विद्युत पोलवर दिवे बसविणे, दर महिन्याच्या १२ व ३० तारखेला स्वच्छता मोहीम राबविणे, कर न भरणाऱ्या नागरिकांकडून वसुलीसाठी प्रत्येक वार्डातील सदस्यांना सोबत घेऊन मोहीम चालविणे, तसेच पंधरावा वित्त आयोगातून निधी आल्यास तो गावकऱ्यांच्या सल्लामसलतीनंतरच वापरला जाईल असे ठरविण्यात आले.


याशिवाय, १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गावाच्या विकासासाठी सहभागातून निधी उभारण्याचे आवाहन ग्रामसेवक शिंदे यांनी केले. विशेष म्हणजे ग्रामसभेत ग्रामसेवक शिंदे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून सर्व प्रश्नांचे निराकरण केले. वादविवाद न होता शांततेत सभा पार पडल्याने ग्रामसेवकांचे कौतुक करण्यात आले.


या ग्रामसभेला सरपंच सौ. सगीताताई भंडारे, उपसरपंच गणेश चामावार, शिवाजी कनकटे, गगारेडी, कोटगिरे, मलरेडी, तलाठी कदम, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, बालाजी शातापुरे, विश्वबर पाटील, अवि चितलवार, चंद्रकांत माणिकमोते, कपिल यनगुलवार, वकील पोतदार, राजु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



