Friday, June 26

Nanded flight service : नांदेड विमानसेवा दोन दिवसांत सुरु होणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पुढाकार

नांदेड (प्रतिनिधी) मागील महिन्यात धावपट्टी खराब झाल्याने बंद पडलेली नांदेड विमानसेवा येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क ठेवून अल्पावधीतच धावपट्टीचे काम पूर्ण करून घेतले आहे. विमान प्राधिकरणाने चाचणी करून विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.

नांदेड विमानतळावरून पूर्वी बेंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, पुणे, पंजाब अशा ठिकाणी विमानसेवा सुरू होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी धावपट्टी खराब झाल्याने एका विमानाला हवेत भरकटावे लागले होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांची पाहणी करण्यात आली होती. त्यात नांदेडच्या धावपट्टीची दुरुस्ती होईपर्यंत सेवा थांबविण्याची शिफारस प्राधिकरणाने केली होती.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कर्डीले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रभावी समन्वय साधून धावपट्टीचे काम जलदगतीने पूर्ण केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कर्डीले म्हणाले कि, “नांदेडची विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत आपला सतत पाठपुरावा सुरू होता. यात्रेकरू, व्यापारी, उद्योजक व पर्यटकांच्या मागणीनंतर ही सेवा लवकर सुरू होणे गरजेचे होते. आता धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून विमानसेवा सुरु होण्यास हरकत नाही.” यामुळे गेल्या चार आठवड्यांपासून ठप्प असलेली नांदेडची विमानसेवा पुन्हा मार्गी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!