soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

1008742331 soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

नांदेड, अनिल मादसवार| गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येऊन आर्थिक नुकसान झाले होते. पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक वायरस (MYMV) या विषाणुंमुळे होतो तर हिरवा मोझॅक हा सोयाबीन मोझॅक वायरस (SMV) या विषाणूमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीच्या हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये काही झाडे अचानक विशिष्ट प्रकारे पिवळी पडलेली दिसून येत आहेत, ही पिवळी पडलेली झाडे म्हणजेच पिवळा मोझॅक (केवडा) या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त झालेली झाडे आहेत. तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव ही झालेला दिसून येतो आहे. या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीनमध्ये 15 ते 75 टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

रोगाची लक्षणे : हिरवा मोझॅक:- यामध्ये झाडाची पाने ही जाडसर,आखूड तसेच कडक होतात व खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात. पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात. प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटते. हा विषाणू बियाणे व पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः मावा या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

पिवळा मोझॅक:- सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.

नुकसानीचा प्रकार – दोन्ही प्रकारच्या मोझॅकमुळे झाडाच्या अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा होऊन अशा प्रादुर्भावग्रस्त झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच मावा व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन करावे.

सोयाबीनवरील मावा,पांढरी माशी आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे:-काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी.

पेरणीस निरोगी बियाण्याचाच वापर करावा. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे जेणेकरून रोगाला वेळीच ओळखून लवकरात लवकर उपाययोजना केल्यास फायदा होईल. मोझॅक(केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.

रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामीप्रिड 25% + बायफेफेंथ्रिन 25 % डब्ल्युजी @ 250 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 47.80 % एससी @ 500 मिली किंवा फ्लोनीकामिड 50.00 % डब्ल्युजी @ 200 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा. मूग,उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. कमीत कमी पहिले 45 दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

1008742327 soybean crops : शेतकऱ्यांनी वेळीच करा सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. मिसळून फवारणी केल्यास पिकाला अपाय होऊ शकतो तसेच कीडनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येत नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगळी वेगळी फवारावी. तसेच लागोपाठ एकच एक कीटकनाशक वांरवार फवारू नये.

फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी 02452-229000 / व्हाटस्अप हेल्पलाईन-8329432097.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top