HomeनांदेडGopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू...

Gopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लातूर| लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे कर्तृत्ववान व संघर्षशील नेतृत्व होते. त्यांची कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. त्यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कृष्णा खोऱ्यातील ७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी यापूर्वीच मंजुरी दिली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता गोदावरी खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच लातूर शहर विस्तारीत पाणी पुरवठा योजना आणि जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

लातूर येथे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री विक्रम काळे, संभाजी पाटील-निलंगेकर, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अभिमन्यू पवार, रमेश कराड, संजय केणेकर, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची उपस्थिती होती.

लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व दिवंगत गोपीनाथरावराव मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत होती. आज जिल्हा परिषदेच्या आवारात दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांचाही पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात आहे. या दोन्ही मित्रांची स्मारके एकाच आवारात आहेत, हा अनोखा योगायोग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवंगत गोपीनाथराव मुंडे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. गृह खाते त्यांनी सांभाळले, त्यांच्या काळात मकोका कायदा आणला गेला. गुन्हेगारी दहशतीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बिकट परिस्थितीतही आपल्या विचारांवर ठाम राहण्याची शिकवण दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी त्यांनी आंदोलने केली. सर्व समाजासाठी दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे हक्काचे घर होते. त्यांची शिकवण अंगिकारली पाहिजे. केंद्रात त्यांना अल्पकाळ केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या अल्पकाळातही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली. त्यांना मोठा कार्यकाळ मिळाला असता तर वेगळे चित्र दिसले असते. असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

लातूर येथील रेल्वे बोगी निर्मिती कारखाना लवकरच सुरु होत असून यामुळे आगमी काळात १० हजार जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या कारखान्याला लागणारे कुशल मनुष्यबळ जिल्ह्यातच तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या पाच वर्षात राज्यातील सर्व शेतरस्ते पक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी सर्वसामान्य व मजूर यांना न्याय मिळवून दिला. विधीमंडळात मुद्दे मांडण्याची त्यांची शैली वाखाणण्यासारखी होती. असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन संघर्षमय होते, कितीही संकटे आली तरी स्वाभिमान गहाण टाकायचा नाही, ही त्यांची शिकवण होती. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच वाटचाल सुरु असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकज मुंडे यांनी सांगितले. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षाचे व कार्याचे आम्ही साक्षीदार आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट वाढवून आणून ३० लाख कुटुंबांना घरकुल देण्याचे काम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

cm 2 Gopinathrao Munde : दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकार करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुत्ती येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण; विविध योजनांचे लाभ वाटप
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० अंतर्गत जळकोट तालुक्यातील गुत्ती येथे उभारण्यात आलेल्या पाच मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या प्रकल्पामुळे ७७२ शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘लातूर जिल्हा : वाटचाल प्रगतीकडे’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उमेद अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘हिरकणी हाट’ लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सअप चॅटबॉटचे उपक्रमालाही यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. उमेद अंतर्गत तुळजाई उद्योग समुहास २ कोटी ५ लक्ष रूपयाचा धनादेश, तसेच रमाई घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाची चावी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. पुष्पगुच्छ, शाल व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव फड यांनी केले. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments