नांदेड। २०२५ या वर्षापर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला हाकेस प्रतिसाद म्हणून नांदेड जिल्ह्यातील ८६ क्षयरोगमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा येथील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ शिवशक्ती पवार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ .सम्यक खैरे व्यासपीठावर उपस्थित होते . जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना उद्देशून केलेल्या आपल्या भाषणातून संपूर्ण जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी तन-मन धनाने कार्यान्वित राहण्यासाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले .
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व उपस्थित असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी वार्तालाप करत येत्या वर्षभरात क्षयरोग मुक्तीच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या सूचना दिल्या . १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ८६ ग्रामपंचायती मधून संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांचे थुंकी नमुने एक्स-रे नेट तपासणी करण्यात येऊन, येथे एकही क्षय रुग्ण आढळून न आल्याने सदर ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणून महात्मा गांधीजी यांची प्रतिमा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ .अमृत चव्हाण ,अनिरुद्ध भावसार तर आभार प्रदर्शन डॉ गणपत मिरदुडे व डॉ जोगदंड यांनी मानले . सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक डॉ . खाजा मोईनुद्दीन, जितेंद्र दवणे ,संतोष दरगु ,जिल्ह्यातील वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ,वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक ,जिल्हा क्षयरोग केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .