नांदेड| कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक प्रणित मराठवाडा, न.पा.,मनपा कामगार कर्मचारी संघटना (लाल बावटा) च्यावतीने आज मनपा कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आजपासूनच आमरण उपोषण सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मनपातील कंत्राटी सफाई कामगारांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रकरणी प्रशासन व कंत्राटदाराकडून प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. कामगारांचे खालील प्रश्न न सुटल्यास आजपासून आमरण उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनात कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे., कंत्राटी कामगारांना वेतन स्लीप अदा करावे.
कामगारांच्या वेतनातून बेकायदेशिररित्या कपात होणारी रक्कम कामगारांना परत द्यावी., कामगारांचे ईपीएफ व इएसआयची कपात त्याच्या वेतनातून करण्यात येते परंतु ईपीएफ व इएसआय कडे भरणा होत नसल्याच्या तक्रारी कामगारांकडून घेत आहेत. त्याची चौकशी करून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी. ईएसआय, ईपीएफ मधील दुरुस्त्या तात्काळ करुन घ्याव्यात., कामगारांना साड्या गम बूट तात्काळ वाटप करावे., काही कामगारांच्या बदल्या कराव्यात.
अँटोनी, ए-टू-झेड, पल्लवी, या कंत्राटदाराने कपात केलेले पीएफ कामगारांच्या चालू आर ऍण्ड बी च्या पी.एफ खात्यात वर्ग करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ.के.के. जांबकर, कॉ.गणेश संदुपटला यांनी केले तर आंदोलनात कॉ.शांताबाई पवळे, कॉ.वंदना वाघमारे, कॉ.वैशाली धुळे, कॉ. अर्चना मोरे यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले होते.