हिमायतनगर,अनिल मादसवार | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हिमायतनगर गटातून झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपले राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.


या अत्यंत चुरशीच्या लढतीत माधवराव पाटील जवळगावकर यांना ११ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल राम राठोड यांना १० मते मिळाली. केवळ एका मताने निकाल लागल्याने ही निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


निकाल जाहीर होताच हिमायतनगरमध्ये समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली. विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी जवळगावकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



विशेष म्हणजे, ही निवडणूक माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली होती. त्यामुळे या विजयाकडे केवळ सहकार क्षेत्रातील यश म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संचालकपदी निवड झाल्यानंतर माधवराव पाटील जवळगावकर यांच्यावर बँकेतील महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. तसेच, ते लवकरच भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करतील, अशाही राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
एक मताच्या फरकाने मिळालेला हा विजय हिमायतनगरच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“विजय हा गोड असतो, पण एक मताने मिळालेला विजय अनेक प्रश्नही मागे ठेवून जातो. कट्टर समर्थकांच्या मतांमध्येच दोन मतांची तफावत दिसत असेल, तर विरोधकांपेक्षा घरभेदींचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. आगामी राजकारणात विश्वासू आणि गद्दार यांच्यातील रेषा ओळखणे हीच खरी नेतृत्वाची परीक्षा असेल.”

