मुंबई| बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला घेऊन पोलीस पथक ठाण्याकडे जात असताना आरोपीने एका हवालदाराची बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी ठरवून अक्षय शिंदेला गोळी झाडून एन्काउंट केला असल्याचा आरोप करत विरोधकांकडून केला जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या दुसऱ्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता आरोपी अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या कंबरेवरून रिव्हॉल्व्हर काढून 3 राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी मोरे यांच्या मांडीला लागली, त्यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. अक्षयने केलेल्या गोळीबारात नीलेश मोरे अधिकारी गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. असे म्हणत पोलिसांनी ठरवून अक्षय शिंदेला गोळी झाडून एन्काउंट केला असल्याचा आरोप करत विरोधकांकडून केला जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.