नांदेड, प्रतिनिधी | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेडहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी एका विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली आहे. नांदेड–मिरज–नांदेड ही विशेष रेल्वे पंढरपूरमार्गे धावणार असून, या गाडीला विशेष भाडे आकारले जाणार आहे.


गाडी क्रमांक ०७६३९ नांदेड–मिरज विशेष २३ जुलै रोजी रात्री ११.५० वाजता नांदेडहून सुटणार आहे. ही गाडी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डुवाडीमार्गे २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार असून, पुढे सांगोला, ढाळगाव आणि कवठेमहांकाळमार्गे सायंकाळी ५.५० वाजता मिरज येथे पोहोचेल.


परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०७६४० मिरज–नांदेड विशेष २५ जुलै रोजी रात्री १२.४० वाजता मिरजहून सुटणार आहे. ही गाडी पंढरपूरमार्गे धावून सकाळी ४.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल आणि कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी व पूर्णामार्गे त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.



या विशेष रेल्वेला वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल श्रेणीचे मिळून २४ डबे असणार आहेत. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, तसेच आरक्षण व वेळापत्रकाची अद्ययावत माहिती अधिकृत रेल्वे माध्यमे किंवा जवळच्या रेल्वे स्थानकातून घ्यावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे.

