नांदेड| लोकांना अंगदानाचे महत्व सांगणे, समाजामध्ये अंगदानाबाबत जनजागृती करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे यासाठी केंद्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आयुष, यांच्याकडून माहे 15 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अंगदान जन जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे 15 जुलै 2024 रोजी महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागामार्फत पोस्टर व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील हे उपस्थित होते. प्रास्ताविक बधिरीकरन शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वैष्णवी कुलकर्णी यांनी अवयव दान जनजागृती मोहिमे अंतर्गत 15 ते दि. 03 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तसेच अवयवदान बाबतीत जनमानसात असलेले प्रश्न व त्यांचे निराकरण करण्याची गरज असल्याचे देखील सांगितले.

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांनी आपल्या भाषणात अंगदानाचे महत्त्व विषद करतांनाच मरावे परी कीर्ती रूपे उरावे या ओळींचा संदर्भ देत अंगदान किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी अंगदान जनजागृती चळवळीची गरज किती आहे नमुद करतांनाच अंगदान मोहीम म्हणजे मृत्यूनंतर आपल्या अवयवयांचे दान करुन इतर गरजू व्यक्तींना जीवनदान देण्याचा एक महान आणि प्रेरणादायी प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले.


आपल्या देशात लोकसंखेच्या मानाने अवयवदान अतिशय कमी प्रमाणात होते व अवयव मिळावे यासाठी कितीतरी रुग्ण प्रतीक्षेत असतात. अवयवदानाची जनजागृती रक्तदानाच्या जनजागृती प्रमाणे व्हावी रक्तदाते स्वतःहून रक्तदानासाठी येतात याप्रमाणे जनमाणसात अवयवदानाची जागृती होऊन लोकांनी स्वतःहून अवयवदानासाठी यावे यासाठी सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन लोकांना अवयव दानासाठी प्रवृत्त करावे असे सांगितले. तसेच या कार्यक्रमांतर्गत 3 ऑगस्ट रोजी अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे तरी सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उत्कर्षा थोरात व डॉ. अनिकेत वानखेडे यांनी केले या कार्यक्रमास उपधिष्ठाता डॉ.हेमंत गोडबोले, वैद्यकिय अधीक्षक डॉ. वाय एच चव्हाण, विभाग प्रमुख डॉ. संजय मोरे, डॉ. धोंडीबा भुरके, डॉ. सुधा करडखेडकर, डॉ.प्रल्हाद राठोड, डॉ. किशोर राठोड, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. चंडालिया डॉ. सोहेल खान, डॉ. मुकुंद कुलकर्णी, डॉ. अनुजा देशमुख, डॉ. भावना भगत, रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीमती अल्का जाधव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सचिन तोटावार, डॉ. नाजिमा मेमन, डॉ. श्रीकांत उमाळे यांनी परिश्रम घेतले. डॉ. राजकुमार गीते यांनी उपस्थिताचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

