नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली सक्ती, धमकी, मानसिक छळ किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणाऱ्या स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व खासगी वित्तीय संस्थांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित संस्थांना दिले.


दुष्काळामुळे शेतकरी आणि अन्य कर्जदार आर्थिक अडचणीत असताना कर्जवसुली करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने वागावे. कर्जदारांना धमकावणे, अपमानास्पद वर्तन करणे, मानसिक त्रास देणे, हिंसाचार करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा वापर करणे किंवा सीबील स्कोअर खराब करण्याची भीती दाखवून दबाव आणणे, अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


नियमबाह्य वसुली केल्यास थेट कारवाई – कर्जवसुलीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वित्तीय संस्थांविरुद्ध पोलीस व जिल्हा प्रशासनामार्फत लागू कायद्यानुसार कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल. नियमबाह्य वसुलीच्या प्रकरणांत कायदेशीर तरतुदींनुसार तातडीने कारवाई करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.



तहसीलदारांसह संबंधित यंत्रणांवर जबाबदारी – तहसीलदार, सहकार विभागाचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने समन्वयाने वित्तीय संस्थांच्या वसुली प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवावी. धमकी, अनधिकृत वसुली किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने पडताळणी करून आवश्यक कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सन्मानाशी तडजोड नाही – दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकरी व सर्वसामान्य कर्जदारांना त्रास देणाऱ्या संस्थांविरुद्ध प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे. कर्जवसुली करताना कर्जदारांच्या सन्मानाचे आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
