नांदेड| केंद्र पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कॉटन श्रेडर यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, नांदेड जिल्ह्यास 114 कॉटन श्रेडर यंत्रांचा तालुकानिहाय लक्षांक प्राप्त झाला आहे.


कापूस शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या घटकाचा योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाने या अभियानास पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या धर्तीवर या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


अनुसूचित जाती-जमातींना 75 हजारांपर्यंत अनुदान – योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कॉटन श्रेडर यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 75 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये, यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था घेऊ शकतात.
‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ – महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी विलंब न करता महाडीबीटीच्या ‘शेतकरी योजना’ विभागातून ऑनलाइन अर्ज करावा. महाडीबीटी संकेतस्थळ: mahadbt.maharashtra.gov.in – शेतकरी योजना
कापूस उत्पादन वाढविण्यासोबतच पीक अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कॉटन श्रेडर तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक कापूस उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.




