नांदेड | नांदेड तालुक्यातील सिद्धनाथ येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने नैसर्गिक शेती आणि शाश्वत कृषी क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा-२०२६’ अंतर्गत गटाने उभारलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत महिलांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेचा लाभ घेऊन मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.


अन्नपूर्णा महिला शेतकरी गटातील १५ सदस्यांनी एकत्रितपणे ३ हजार लिटर जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक, १५ व्हर्मी बेडच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती, परसबाग विकास, वृक्षलागवड तसेच सोयाबीन पिकातील एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) अंमलबजावणी केली आहे. या उपक्रमांची माहिती गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मृदा पूजनही करण्यात आले.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महिला शेतकरी गटातील एकजूट, समन्वय आणि नियोजनाचे विशेष कौतुक केले. सकारात्मक ऊर्जा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळविण्यासाठी त्यांनी गटाला शुभेच्छा दिल्या. नैसर्गिक शेतीसोबतच PMFME योजनेच्या माध्यमातून कृषीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.




पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत – जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलगाडीतून टाळ-मृदंगाच्या गजरात मान्यवरांची मिरवणूक काढली. औक्षण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच, शिवानंद स्वामी मठ संस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी महिला गटाने जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा उभारावी, त्यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. तसेच भविष्यात सीड बँक उभारून स्थानिक बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी व विक्री करून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर कैलास पेरके यांनी जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रवीण खुळे यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेची माहिती दिली. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप, उपकृषी अधिकारी लक्ष्मण चचुवार, सहाय्यक कृषी अधिकारी वसंत जारीकोटे, कैलास पेरके, पाणी फाउंडेशनचे प्रवीण खुळे व विशाल इंगळे, उमेदचे तालुका समन्वयक हनुमंत कंदुरके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत जारीकोटे यांनी केले. तर गटाच्या निमंत्रक जयश्री आवातीरक यांनी सोयाबीनमधील एसओपी अंमलबजावणीची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.

