HomeकृषीAgriculture News : हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जिल्हाधिकारी यांच्याकडे...

Agriculture News : हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

तीन वर्षांपासून प्रभावी कृषी मार्गदर्शन शिबिरांचा अभाव; शेतकरी योजनांपासून वंचित असल्याचा आरोप, खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी

हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना पीक नियोजन, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच शासनाच्या कृषी योजनांची माहिती देणे अपेक्षित असताना हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाचा कारभारच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मागील तीन वर्षांपासून हिमायतनगर शहर व परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रभावी कृषी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि मार्गदर्शन शिबिरांच्या नावाखाली झालेल्या खर्चाचा संपूर्ण हिशेब सार्वजनिक करावा, आणि शिबिराच्या नावाखाली स्वतःची तुंबडी भरू पाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी, हिमायतनगर व परिसरातील कृषी सहाय्यक यांची चौकशी करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘कागदावर शिबिरे, शेतकरी मात्र मार्गदर्शनापासून वंचित?’ शासनाच्या कृषी विभागाकडून खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा आणि मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना असतात. या शिबिरांमधून पीक नियोजन, योग्य बियाणे निवड, माती परीक्षण, खतांचा संतुलित वापर, कीड व रोग नियंत्रण आणि विविध शासकीय योजनांची माहिती देणे अपेक्षित असते. मात्र, हिमायतनगर शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षांपासून या मार्गदर्शनाचा प्रभावी लाभ मिळाला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी असतानाही शहरात मोठे व सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.

काही ठिकाणी मोजक्या लोकांना बोलावून खासगी ठिकाणी केवळ कागदोपत्री कार्यक्रम दाखविले गेल्याची चर्चा असून, केवळ फोटो सेशन करून मार्गदर्शन शिबिरांच्या नावाखाली शासनाच्या निधीचा अपव्यय किंवा गैरवापर झाला का? असा थेट सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. या बाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक आपल्या स्वतःच्या मार्जितील शेतकऱ्यांना बोलावून फोटो काढून शासनाची व जनतेची दिशाभूल करत स्वतःच फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

शेतकरी अज्ञानात; चुकीच्या निर्णयांचा आर्थिक फटकाकृषी विभागाकडून वेळेवर मार्गदर्शन न मिळाल्याने शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान, योग्य बियाणे, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, माहितीअभावी शेतकरी चुकीचे निर्णय घेत असून त्याचा थेट आर्थिक फटका बसत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर असून, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कोणाचा कारभार सुरू आहे? असा सवालही उपस्थित होत आहे.

निधीचा हिशेब जाहीर करा; अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित कराया प्रकरणाची सखोल चौकशी करून मागील तीन वर्षांत कृषी मार्गदर्शन शिबिरांसाठी किती निधी मंजूर झाला, किती खर्च झाला, कोण कोणत्या गावांत कार्यक्रम घेण्यात आले आणि प्रत्यक्ष किती शेतकरी सहभागी झाले, काही ठिकाणी केवळ 20 ते 25 शेतकऱ्यांना घेऊन फोटो काढून दाखविण्यात आलेल्या कागदी पुराव्याची चौकशी करून याचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये तातडीने कृषी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांची माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. आता हिमायतनगर कृषी कार्यालयाच्या कथित निष्काळजी व संशयास्पद कारभाराची चौकशी होते का..? की हे प्रकरणही फाईलींच्या ढिगाऱ्यात दडपले जाते? याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगांवकर, शहराध्यक्ष अमोल धुमाळे यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments