HomeराजकीयDistrict Bank Election : लोह्यात चिखलीकर, राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकरी विकास...

District Bank Election : लोह्यात चिखलीकर, राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकरी विकास पॅनेल’ची प्रचार बैठक

‘एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा त्या सभागृहात कधीच गेलो नाही’ – हणमंतराव बेटमोगरेकर

लोहा| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास पॅनेलच्या जिल्हाक्षेत्र मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी लोहा शहराजवळील कारेगाव येथील एमएच-२६ वॉटर पार्क येथे लोहा-कंधार तालुक्यातील मतदारांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राजेश पवार यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकरी विकास पॅनेल उभे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकत्रित येण्याचे स्वागत केले.

‘संघर्ष किती काळ करायचा, कुठेतरी थांबायला पाहिजे. आज हे चित्र उभे राहिले आहे, ते या दोन नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे,’ असे सांगत राजूरकर यांनी शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आपल्या भाषणातून जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देत ‘मी एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा त्या सभागृहात कधीच गेलो नाही,’ अशी खंत खुमासदार शैलीत व्यक्त केली. मात्र, बँकेत दुसऱ्यांदा संधी मिळाली ती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा-कंधार तालुक्यातून शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन केले. ‘मी स्वतः मतदार आहे, असे समजून पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदान करा आणि मोठे मताधिक्य मिळवून द्या,’ असे आवाहन त्यांनी केले. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींची माहिती त्यांनी उपस्थित मतदारांना दिली. या निवडणुकीत जिल्हाक्षेत्र मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार रामचंद्र मुसळे, ज्ञानेश्वर दहिफळे आणि अनिल पाटील बाभळीकर यांच्या प्रचारासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी आमदार राजेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर यांचीही भाषणे झाली. बैठकीस माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, प्रणिताताई देवरे चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नवनिर्वाचित संचालक मारोतराव कवळे गुरुजी, शिवराम लूटे, सचिन पाटील चिखलीकर, भोकर कृउबा सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष शरद पवार, माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, बाबुराव गीरे, उपनगराध्यक्ष करिम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, जफरोद्दीन बाहोद्दिन, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष छत्रपती स्वामी, मनोहर भोसीकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी केले. बैठकीस लोहा-कंधार तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments