नांदेड | किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर गती मिळाली असून या संदर्भातील प्रारूप प्रस्ताव प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २१ एप्रिल २०२६ रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार इस्लापूर येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या ११ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या प्रस्तावाची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.


प्रस्तावानुसार नव्या अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात इस्लापूर, जलधारा आणि शिवणी मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या ही तीनही मंडळे किनवट तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतात.



नवीन कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांसाठी किनवट येथे जाण्याची गरज कमी होणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रस्तावाबाबत कोणत्याही नागरिकास हरकत अथवा सूचना असल्यास त्यांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
