Himayatnagar’s ‘Jugaad Chul’ : गॅस टंचाईला ‘देशी टेक’ उत्तर ! मोबाईल बॅटरीवर धगधगते हिमायतनगरची ‘जुगाड चूल’
हिमायतनगर (अनिल मादसवार) : गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या लहान हॉटेल व्यवसायिकांसाठी हिमायतनगरातील एका युवकाने भन्नाट आणि किफायतशीर उपाय शोधून काढला आहे. मोबाईल बॅटऱ्यांच्या मदतीने चालणारी ‘जुगाड चूल’ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.


बसस्थानक परिसरातील मार्कंडेय टी अँड टिफिन सेंटरचे चालक अमोल बद्दापूरवार यांनी हा अनोखा प्रयोग साकारला आहे. तीन मोबाईल बॅटऱ्यांमधून तयार होणाऱ्या वीजेच्या साहाय्याने डीसी फॅन आणि हेअर सेटिंग मशीन वापरून त्यांनी कोळसा-लाकडाची चूल पेटवण्याची नवी पद्धत विकसित केली आहे.

या चुलीची खासियत म्हणजे — फक्त स्विच ऑन केला की फॅन चुलीत जोरदार हवा फुंकतो आणि काही क्षणांतच कोळसा लालभडक होतो. त्यामुळे कमी वेळात जास्त उष्णता मिळते आणि स्वयंपाक जलद गतीने पूर्ण होतो.



या ‘जुगाड चुली’वर काय होते? चहा बनवणे, तब्बल २० किलो खिचडी शिजवणे, २० लिटर दूध तापवणे, यासह इतर स्वयंपाकाची कामे देखील होऊ शकतात. विशेष म्हणजे, कमी खर्चात तयार झालेली ही चूल गॅसशिवाय हॉटेलचे पूर्ण काम सुरळीत चालवते. त्यामुळे इंधनाच्या वाढत्या दरात आणि टंचाईत हा प्रयोग ‘गेमचेंजर’ ठरत आहे.


सध्या हिमायतनगरमध्ये या नवकल्पनेची जोरदार चर्चा असून, अनेकजण अमोल बद्दापूरवार यांच्या कल्पकतेचे कौतुक करत आहेत. संकटात संधी शोधण्याचा आणि स्वदेशी उपायांनी मार्ग काढण्याचा हा आदर्श प्रयोग ठरत आहे.
‘जुगाड’पासून ‘इनोव्हेशन’कडे!
गॅस टंचाईच्या समस्येला स्थानिक पातळीवर दिलेले हे उत्तर आता इतर छोट्या व्यावसायिकांसाठीही प्रेरणादायी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



