Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट

yellow Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट

नांदेड| भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

माहितीनुसार १६ व १७ मार्च या दोन दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच १८ व १९ मार्च या दोन दिवसांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी खबरदारी

  • विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास अनावश्यक बाहेर जाणे टाळावे.
  • मोकळ्या जागेत असाल व सुरक्षित इमारत जवळ नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.
  • आकाशात वीज चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा.
  • घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करावीत.
  • तारांचे कुंपण, विजेचे खांब व लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.
  • पाण्यात उभे असल्यास तात्काळ बाहेर पडावे.

काय टाळावे

  • विजांचा कडकडाट सुरू असताना लँडलाईन फोनचा वापर करू नये.
  • शॉवरखाली अंघोळ करणे टाळावे.
  • बेसिनचे नळ, पाण्याच्या पाईपलाईन किंवा विद्युत उपकरणांना स्पर्श करू नये.
  • लोखंडी संरचनेच्या तंबू किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये.
  • उंच झाडाखाली किंवा धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबू नये.
  • वीज पडताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून पाहणे टाळावे.
  • वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी तसेच नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top