Tembhi Road Construction : हिमायतनगरच्या अमराई पार्डी पॉईंट पासून ते –टेंभी मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे नागरिक हैराण
ऑटो स्लिप सुदैवाने कोणतीही जीवितहानी, मात्र ठेकेदाराच्या कामाबद्दल संताप
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातून अमराई पार्डी पॉईंट ते टेंभी गावाकडे जाणाऱ्या सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असले तरी अद्यापही पूर्ण झालेले नाही. रस्त्यावर टाकून ठेवलेल्या डीपी व बांधकाम साहित्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, आज सकाळी प्रवासी घेऊन जाणारे एक ऑटो रस्त्यावर टाकलेल्या खडी व मातीमुळे घसरून खड्ड्यात झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळला.


या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक असते. मात्र या ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

त्यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या घटनेनंतर सोशल मीडियावर या रस्त्याचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.



दरम्यान, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच आजी-माजी आमदार व खासदार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, यासाठी तातडीने सुरू असलेल्या रस्त्याच्या दर्जेदार काम करून तात्पुरता पर्याय नसतो उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.




