Saturday, June 27

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

नांदेड |  राज्यात सुरू असलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा शेवट बुधवारी झाला. परीक्षेच्या अंतिम दिवशी आपल्या नवजात तान्हुल्या बाळाला सोबत घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या मातेचा पीपल्स महाविद्यालयात विशेष सन्मान करण्यात आला.

विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला राज्यभर १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. या परीक्षेचा समारोप बुधवारी झाला. नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकूण ८६१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवण्यात आले होते. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथक आणि बैठे पथकाद्वारे काटेकोर देखरेख करण्यात आली.

दरम्यान, परीक्षेदरम्यान पीपल्स महाविद्यालयात अत्यंत हृदयस्पर्शी घटना घडली. शितल चंद्रकांत चिते (वय २१) या मातेने आपल्या नवजात तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी बोर्डाची परीक्षा दिली. शितलला बाळासह परीक्षा देताना पाहून अनेकांचा कंठ दाटून आला.

शितलची शिक्षणाबद्दलची जिद्द पाहून महाविद्यालय प्रशासनानेही संवेदनशीलता दाखवत तिच्यासाठी ‘मातृ स्नेह कक्ष’ तयार केला. या कक्षात बाळाला विश्रांती घेता यावी यासाठी पाळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आईची माया आणि शिक्षणाची ओढ यांचा सुंदर संगम पाहून शितलचे सर्वत्र कौतुक झाले. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते शितलचा सन्मान करण्यात आला. यावेळी तिच्या बाळासाठी पाळणा भेट देण्यात आला.

बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख प्रा. विजय कदम, सहकेंद्रप्रमुख प्रा. जी. डी. ताडोड, प्रा. डॉ. विनोद चव्हाण, शरद डहाळे, सूर्यकांत राऊत, संदेश लांडगे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!