Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

mc58rs9h8mczkb7gw2ek Women's Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नांदेड| जागतिक महिला दिनानिमित्त कोरो इंडिया, विविध सामाजिक संस्था व एकल महिला संघटनेच्या पुढाकारातून मराठवाडा विभागस्तरीय महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिडको येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होणार आहे.

ग्रासरूट नेतृत्व आणि संस्था विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश लैंगिक समानतेचा संदेश गावोगावी पोहोचवणे, महिलांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करणे हा आहे. स्पर्धेच्या ठिकाणी महिलांसाठी समुपदेशन केंद्रही उभारण्यात आले असून महिलांमध्ये आत्मविश्वास, एकजूट आणि नेतृत्वगुण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध लेखिका व प्राध्यापक डॉ. विजयाताई भारत दाढेल उपस्थित राहणार असून उद्घाटन तृतीय पंथीय समुदायातील श्रीमती मन्नत संग्राम तेलंगे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासक व अभिनेत्री डॉ. अनुराधाताई पत्की, सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. रेखाताई काळे आणि प्रा. वैशालीताई सावंत उपस्थित राहणार आहेत.

कबड्डी सामने संपल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा नांदेड महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविताताई संतोष मुळे यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त नगरसेविका सौ. सुवर्णा सतीश पा. बस्वदे, सौ. निरंजना राजू लांडगे, श्रीमती मंगलाताई गजानन देशमुख, सौ. सरिताताई उमेशराव पवळे, डॉ. मंजुषा प्रसाद रानवळकर, माजी नगरसेविका सौ. बेबीताई गुपिले व सौ. ललिताताई शिंदे-बोकारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच तृतीय पंथीय समुदायातील अमोल डोईजडे, चंद्रकला देवकर, जयेंद्र सोमवंशी व भिमाशंकर कांबळे हेही उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या आयोजनात रयत सेवाभावी संस्था सुजलेगाव (नांदेड), वंचित विकास लोक संस्था नांदेड, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना नांदेड, महिला जागृत संस्था परभणी, जनजागृती बहु. जिजामाता सेवाभावी संस्था अहमदपूर (लातूर), संकल्प सेवाभावी संस्था वायेगाव (अहमदपूर), लोक विकास केंद्र पाथरी (परभणी), छत्रपती शाहू समता प्रतिष्ठान पूर्णा (परभणी), अभिजीत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोली, जन विकास मंडळ बाळहाळी, रूढीग्रस्त लोकवंचित कलावंत परिषद परभणी तसेच सर्वांगीण मानवविकास संस्था रूमणा (ता. गंगाखेड) या संस्थांचा सहभाग आहे. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रयत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. इरवंत सुर्यकार यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top