हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | येथील श्री परमेश्वर यात्रेतील बहुप्रतिक्षित कुस्ती स्पर्धेने महाशिवरात्री यात्रेचा दिमाखदार समारोप झाला. यात्रेतील कुस्तीच्या मैदानात विशेषतः दुसऱ्या क्रमांकाची चांदीची गदा बक्षीस असलेली कुस्ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सह परराज्यातून अनेक नामांकित पैलवान दाखल झाले होते.


दिवंगत पत्रकार परमेश्वर मारोती शिंदे यांच्या स्मरणार्थ दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी नागेश शिंदे यांनी या कुस्तीसाठी ११ हजार रुपये रोख व एक किलो चांदीची गदा असे आकर्षक बक्षीस जाहीर केले होते. या प्रतिष्ठेच्या लढतीत हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील पैलवान निलेश शनेवाड यांनी दमदार डावपेच आणि थरारक झुंज देत प्रतिस्पर्ध्याला चित्त करून मैदान दणाणून सोडले आणि विजयाचे मानकरी ठरले.


हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील पैलवानाने सलग दुसऱ्या वर्षी मिळविलेल्या विजयाने प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळली. त्यानंतर प्रथम व द्वितीय बक्षीस जिंकलेल्या दोन्ही विजयी पैलवानांची हलगीच्या गजरात आणि जल्लोषात भव्य मिरवणूक काढत ती श्री परमेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली.


मंदिरात परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस व दुसऱ्या विजेत्या पैलवानास चांदीची गदा व 11 हजाराचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. एकूणच, श्री परमेश्वर यात्रेतील कुस्ती स्पर्धेने परंपरा, श्रद्धा आणि क्रीडाजिद्दीचा संगम घडवत यात्रेचा शानदार समारोप झाला.


