Friday, June 26

District Collector Rahul Kardile : माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड| दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, सर्व सुविधा अखंडित पुरवल्या जाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.

पहिल्या दिवशी देवस्वारी – दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन – यात्रेच्या पहिल्या दिवशी (18 डिसेंबर) देवस्वारी आणि पालखी पूजन होणार असून दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन आणि दुग्धस्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सुविधा प्रशासनाद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन, कृषी, पोलीस, बीएसएनएल, महावितरण, परिवहन, आरोग्य यांसह सर्व विभागांच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.

बैठकीस उपस्थित अधिकारी – बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, माळेगाव सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेत शासकीय योजनांचे स्टॉल – भाविकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळावी म्हणून—मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, महाविस्तार अ‍ॅप, ॲग्रीस्टॅक, आयुष्यमान भारत, महिला व बालविकास विभाग, पशुसंवर्धन विभाग यांचे माहितीपर स्टॉल उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच बीएसएनएलने यात्रेदरम्यान अखंडित वायफाय व नेटवर्क सेवा उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले.

WhatsApp Image 2025 12 10 at 4.56.13 PM District Collector Rahul Kardile : माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महत्त्वाच्या सुविधा व व्यवस्थापन – मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यात्रेसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. त्यात—सीटीव्ही कॅमेरे, वॉशरूम व स्वच्छता व्यवस्थापन, बॅरिकेटिंग, मंदिराकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची दुरुस्ती, हेलिपॅड, स्वच्छतेसाठी मोबाईल व्हॅन, विविध स्पर्धा आणि पशुप्रदर्शनासाठी निधी यांचा समावेश आहे.

पोलीस बंदोबस्त अधिक मजबूत – कला महोत्सव क्षेत्र, मंदिर परिसर, कुस्ती मैदान, कृषी व पशुप्रदर्शन स्थळ, बसस्टॅंड आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील मनुष्यबळ आणि नियोजनाची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी बैठकीत दिली. सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगुंडे यांनी यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक स्थानिक सुविधा व मागण्यांची माहिती बैठकीत मांडली. यात्रेची सर्वांगीण तयारी प्रभावीपणे राबवून भाविकांना उत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!