Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग

5d4f3d11 3984 48ae b4b6 3eab2f96002204112025174337 Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : पाचव्या दिवशी उमेदवारीची लगबग

हिमायतनगर (अनिल मादसवार) मागील पाच वर्षांपासून रखडलेली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक अखेर रंगात येताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नगरसेवक पदासाठी तब्बल १६ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. चार दिवस शांत असलेले वातावरण अचानक गजबजले आहे आणि राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत.

★ उमेदवारीसाठी मनधरणी, दबाव-तणाव आणि पक्षांतर्गत रस्सीखेच वाढली – हिमायतनगरमधील सर्व १७ प्रभागांत इच्छुकांची भिस्त वाढलेली असून, काहीजण वरिष्ठ नेत्यांची मर्जी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. तर अनेक जण आपली राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी पक्षांतर्गत वजन वापरत आहेत. ज्यांना तिकीट मिळण्याबाबत शंका आहे, ते दोन–तीन पक्षांतून तिकीट मागत आहेत. काहींनी तर पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याचे समजते. त्यामुळे अनेकांचे “तळ्यात मळ्यात” असे राजकीय गणित दिसून येत आहे.

★ निवडणूक म्हणजे दरबार — काही वाड्यात जेवणावळी, तर काही ठिकाणी पार्ट्या सुरु ! –  निवडणुकीची घोषणा अधिकृत न होता देखील काही इच्छुकांनी खाण्यापिण्याच्या पार्टी, बैठकांचा सपाटा, कार्यकर्त्यांचे गट-तट यांना सुरुवात केली आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” या सूत्रावर उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

पक्षांचे समीकरण : स्वबळाचा नारा विरुद्ध युतीचे राजकारण
काँग्रेस : स्वबळावर लढणार
शिवसेना (उबाठा) + राष्ट्रवादी (शरद पवार गट) : युतीत लढण्याचे संकेत
भाजपा + शिवसेना (शिंदे गट) : युतीची चिन्हे
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : स्वबळावर — नगराध्यक्ष उमेदवार जाहीर
म्हणजेच काही ठिकाणी त्रिकोणी तर काही ठिकाणी चौरंगी ते पंचरंगी लढतीची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीचा परिणाम — महायुतीकडे डोळे – मागील विधानसभा निवडणुकीत कांग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांची युती होती. मात्र या स्थानिक निवडणुकीत ते समीकरण फिसकटले आहे. तिथे भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी (अजित) यांनी महायुतीचा गड मजबूत ठेवला होता. त्यामुळे या निवडणुकीत कोण कोणासोबत? हा प्रश्नच शहरातील चर्चेचा मुख्य विषय ठरू लागला आहे.

गराध्यक्ष पदाचा अनिश्चितता — फक्त राष्ट्रवादी (अजित गट) सज्ज – एकमेव नगराध्यक्ष पदासाठी राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे —माजी उपनगराध्यक्ष म. जावेद अब्दुल गणी यांच्या नावावर स्वाक्षरी झाल्याचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील मिराशे व विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव यांनी अधिकृतरित्या पुष्टी केली. काँग्रेस, शिवसेना, भाजपा, उबाठा–राष्ट्रवादी यांच्याकडून मात्र अद्याप नाव जाहीर झाले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये तत्परतेने चर्चा सुरू आहे की, कोणत्या पक्षाकडून कोणते नाव पुढे येते? कोणाची ताकद कोणत्या प्रभागात जास्त?

प्रतिष्ठेची लढत — आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार अशोकराव चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, ते मैदानात आल्याने हिमायतनगरच्या राजकारणाची दिशा बदलली असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आजी माजी आमदार, माजी खासदार, वरिष्ठ नेते सर्वांनीच प्रतिष्ठेची कसोटी लावली आहे. त्यामुळे हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली, तापलेली आणि रोमहर्षक ठरणार हे निश्चित.

यंदाची नगरपंचायत निवडणुकीच्या मतदाराची एकूण संख्या १७ हजार ३२३ असून, यात महिला मतदार संख्या ८ हजार ५६९ तर पुसरुष मतदार संख्या ८ हजार ७५७ आहे. २०२५ ची नगरपंचायत निवडणूक संघर्ष, कटकारस्थाने, युती-संघर्ष आणि स्वबळाचा नारा – या सर्व घटनाक्रमामुळे हिमायतनगर निवडणूक अटीतटीची, दणदणीत आणि अनेक स्तरांवर प्रभावशाली होणार असून, उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अंतिम तारखेनंतरच खरी लढत स्वच्छ दिसू लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top