किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील तल्हारी शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना बोगस पोटॅश या खताची विक्री होत असतांना पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकून चारचाकी वाहनासह ४१ बॅग खत असा एकूण ५ लाख ५६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करूं कारवाई करण्यात आली.
गुणवत्ता व गुणनियंत्रण निरीक्षक तथा पं.स.चे कृषी अधिकारी शिवराम मुंडे यांना तालुक्यातील तल्हारी या गावच्या शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना पोटॅश या खताची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, इस्लापूरचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी जाधव, बोधडीचे कृ.प. बाळासाहेब ठेंगे, कृषी सहाय्यक गजानन गोरे, धर्मेश पोगुलवार, सुनीता चातरे व रेणुका बुलबुले यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले.
तेव्हा एम.एच.१४ एच.यू. ८५६३ क्रमांकाच्या एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा मॅक्स पिकअप व्हॅनमधून कृषी भारती फर्टिलायझर इंडस्ट्रीज या कंपनीच्या बॅगवर पीआरओएम (‘पोटॅश रिच आर्गनिक मन्युअर’) या नावाच्या बोगस पोटॅश खताची विक्री होत असतांना आढळून आले. विक्री करणारे सुभाष राठोड रा. उमरहिरा तांडा, पो. पवना ता. हिमायतनगर जि. नांदेड यांच्याकडे उगम प्रमाणपत्र, खत विक्री परवाना, कंपनीच्या जबाबदार व्यक्तींचा नाव, पत्ता आदी कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यावरून या संशयास्पद सेंद्रीय खताचा नमुना घेऊन तो छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, वाहनात आढळलेले ५६ हजार ९९० रुपये किंमतीचे ४१ बॅग खत आणि अंदाजे ५ लाख रुपये किंमतीचे वाहन असा मिळून एकूण ५ लाख ५६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल साक्षीदारासमक्ष पंचनामा करून जप्त केला. नंतर सदर माल व वाहन इस्लापूर पोलिस ठाण्यात नेण्यात आला. मुंडे यांनी फिर्याद दिल्यानंतर हे वाहन व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आरोपीविरुध्द गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यात दुसऱ्यांदा बनावट खताचा साठा जप्त करण्याच्या कारवाईवरून तालुक्यातील बोगस बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची छुपी विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.