नांदेड| दिव्यांग व्यक्तींप्रती समाजाने अधिक संवेदनशील असणे आवश्यक असून त्यांच्या सक्षमी करणसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव महेश सोवजी, बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, निवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचार्यांच्या पदोन्नती आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी संवेदनशीलतेने कामे केली आहेत. भविष्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आयएएस प्रशिक्षणादरम्यान दिव्यांग अधिकारांबाबत घेतलेल्या प्रशिक्षणाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. समाजातील प्रत्येक व्यक्तीने दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची गरज आहे, तसेच दिव्यांगांच्या गरजांकडे लक्ष देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
या सोहळ्यात महेश सोवजी यांनी दिव्यांग व्यक्तींना न्यायालयीन तरतुदींबाबत माहिती दिली. तसेच, डॉ. आशिष अग्रवाल यांनी मार्गदर्शन करातांना समुपदेशन हे दिव्यांगांच्या जीवनातील महत्त्वाचे घटक असल्याचे सांगीतले. माजी समाजकल्याण अधिकारी बापू दासरी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. सुत्रसंचालन नितीन निर्मल तर उपस्थितांचे आभार कैलास मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हयातील दिव्यांग शाळेतील कर्मचारी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.