इसापूर उजव्या कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सिंचन नियोजन जाहीर

दोन्ही हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्या पहिली पाणीपाळी 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार सिंचनासाठी नमुना 7 व 7-अ मध्ये विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे लाभधारकांना आवाहन

NNL Team
By NNL Team

नांदेड| उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजव्या कालव्याद्वारे सन 2026-27 या वर्षातील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्राथमिक सिंचन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही हंगामांत प्रत्येकी दोन पाणीपाळ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी 1 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. सिंचनासाठी पाणी घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारकांनी नमुना क्रमांक 7 व 7-अ मध्ये पाणी मागणी अर्ज भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक 1, नांदेड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या दि. 5 ऑक्टोबर 2026 रोजीच्या आदेशानुसार अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करण्यात आले आहे. त्यानंतर उपलब्ध राहणाऱ्या पाणीसाठ्याच्या आधारे रब्बी व उन्हाळी हंगामाचा प्राथमिक सिंचन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाले आणि मुख्य कालव्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या लाभधारकांनाही या नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सन 2026-27 मधील रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणीपाळ्यांचे वेळापत्रक  – रब्बी हंगाम 2026-27 साठी पहिली पाणीपाळी दि. 1 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2026 (24 दिवस), दुसरी पाणीपाळी दि. 20 डिसेंबर 2026 ते 13 जानेवारी 2027 (24 दिवस) याप्रमाणे राहील. उन्हाळी हंगाम 2026-27 साठी पहिली पाणीपाळी दि. 1 मार्च ते 24 मार्च 2027 (24 दिवस) तर दुसरी पाणीपाळी दि. 20 एप्रिल ते 14 मे 2027 (24 दिवस) याप्रमाणे राहील. पाऊस, तांत्रिक अडचणी किंवा अन्य आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळ्यांच्या निर्धारित तारखांमध्ये बदल होऊ शकतो. पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणास प्राधान्य देण्यात आले असून, आवश्यकतेनुसार पाणीपाळीच्या कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार सनियंत्रण समितीकडे राहतील.

पाणी मागणी अर्जासोबत उपसा सिंचन परवानगी आवश्यक – सिंचनासाठी कालव्याचे प्रवाही पाणी, मंजूर उपसा सिंचन योजना तसेच मंजूर जलाशय व नदी-नाल्यांवरील उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उपसा सिंचनासाठी अर्जासोबत संबंधित परवानगीची प्रत जोडावी. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असणे आवश्यक आहे. तसेच लाभधारकांनी त्यांच्याकडील संपूर्ण थकित पाणीपट्टी भरलेली असावी. कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली शेतचारी स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची राहील. मंजूर कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक आहे. पाणीपट्टी न भरलेल्या किंवा पाणी मागणी अर्ज नामंजूर झालेल्या लाभधारकांना सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जाणार नाही.

विनापरवानगी पाणी उपसा केल्यास दंडात्मक कारवाई – पाणीपाळीदरम्यान विनापरवानगी विद्युत मोटारी किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाणी उपसा करणे अथवा कालव्याची द्वारे उघडणे यासारखे प्रकार आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरित केलेल्या लाभक्षेत्रात पाणी मागणी, पाणीपट्टी वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण संबंधित पाणी वापर संस्थेने करणे आवश्यक आहे. अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा करणे शक्य न झाल्यास, तसेच कालव्याची दुरुस्ती आवश्यक असल्यास, परिस्थितीनुसार पाणी सोडण्याच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. कालवा संचलनादरम्यान नुकसान झाल्यास दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच पाणी सोडण्यात येईल. मंजुरीच्या अटींचे किंवा महाराष्ट्र पाटबंधारे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्यास मंजुरी रद्द करून पाणीपुरवठा बंद करण्यात येऊ शकतो.

सर्व लाभधारकांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम व अटींचे पालन करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सिंचन नियोजनात विभागास सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक 1, नांदेड यांनी केले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!