नांदेड| ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या अनुषंगाने अन्नपदार्थांतील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांच्या संयुक्त पथकाने दि. 26 ऑक्टोबर 2026 रोजी नांदेड येथील औद्योगिक वसाहतीतील मे. शिवगंगा ऑईल मिल या खाद्यतेल उत्पादक पेढीवर छापा टाकून 9 हजार 744 किलो संशयित भेसळयुक्त खाद्यतेलाचा एकूण 20 लाख 99 हजार 507 रुपये किमतीचा साठा जप्त केला.


नांदेड एमआयडीसीतील डी-19 येथे असलेल्या मे. शिवगंगा ऑईल मिल या पेढीवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या डबल फिल्टर्ड शेंगदाणा तेल, परिष्कृत सोयाबीन तेल आणि परिष्कृत सूर्यफूल तेल या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या खाद्यतेलात भेसळ असल्याच्या संशयावरून संबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई सहआयुक्त (अन्न), छत्रपती संभाजीनगर श्री. करकाळे यांच्या निर्देशानुसार आणि सहायक आयुक्त (अन्न), नांदेड परिमंडळ-1 सु. दा. जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगरचे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश चिभडे तसेच नांदेडचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अ. के. दुधाटे आणि स. वि. कनकावाड यांचा समावेश होता.



नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अन्नपदार्थांतील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी आवश्यक तपासणी व नियमानुसार कारवाई करण्यात येत असून, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
