नांदेड, अनिल मादसवार | दिवाळीच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी, तिकिटांची कमतरता आणि खासगी वाहतुकीचे वाढते दर लक्षात घेता प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी मुंबई व पुणे येथून नांदेडकरांसाठी प्रत्येकी दोन विशेष रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात भाजप नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष तथा रेल्वे बोर्डाच्या DRUCC चे सदस्य किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (DRM) निवेदन देण्यात आले.


रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागण्या – निवेदनाद्वारे मुदखेड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तिकीट विक्री मशीन बसविणे, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नंदीग्राम व देवगिरी एक्सप्रेसला अतिरिक्त जनरल डबे जोडणे, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच नांदेड–भोकर–हिमायतनगर–किनवट–आदिलाबाद रेल्वे मार्गावर इंटरसिटी गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली. नांदेड रेल्वेस्थानकावर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इंटरसिटी गाड्यांचा योग्य वापर करून प्रवाशांना अधिक रेल्वेसेवा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.


निर्णय नाही तर प्रवाशांची गैरसोय कायम! दिवाळीसारख्या मोठ्या सणात प्रवाशांना वेळेत तिकीट मिळत नसल्याने आणि खासगी वाहनांचे भाडे वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता विशेष गाड्या, अतिरिक्त डबे आणि वाढीव फेऱ्यांबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा प्रवास मिळणार का, याकडे आता नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.



