हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले धाडसी पोलीस कर्मचारी श्री. नवाब खान पठाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी पदोन्नती झाल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर, वाढोणा येथे त्यांचा सन्मान करून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.


नवाब खान पठाण यांनी आपल्या पोलीस सेवेदरम्यान धाडसी कारवायांमध्ये सहभाग घेतला असून, चोरट्यांविरुद्ध कारवाई करून त्यांना पकडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्तव्य बजावताना धाडस आणि तत्परतेसाठी ओळख असलेल्या पठाण यांच्या पदोन्नतीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ आणि सचिव आनंता देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी मंदिर ट्रस्टचे संचालक संजय माने, विलास वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वामनराव पाटील वडगावकर, पंडित ढोणे, मनोज पाटील, दुर्गेश सोनारीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



नवाब खान पठाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील पोलीस सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील कारकिर्दीतही जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्याकडून उत्तम कार्य घडावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

