नांदेड, प्रतिनिधी | पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या संकटाची गंभीर दखल घेतली आहे. नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पंचनामे व पाहणीच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी नांदेड जिल्ह्यातील सोनखेड व लोहा परिसरातील पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


पावसाअभावी अनेक भागांतील पिके करपून गेली असून शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. “मी मराठवाड्याचीच लेक असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणते. शेतकऱ्यांच्या भावना शासनाने गांभीर्याने घेतल्या आहेत,” असे पवार यांनी सांगितले. प्रशासनाला प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी व पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ज्या शेतकऱ्यांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यानुसार मदत देण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबतही शासनाची भूमिका स्पष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले.



पिण्याचे पाणी, चारा आणि शिक्षणासाठीही मदत
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, चारा तसेच मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक मदत शासनाकडून करण्यात येईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शेतकरी व महिला शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. “या संकटात राज्य शासन पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल,” असा दिलासा त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

