हिमायतनगर, अनिल मादसवार| पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने सरसम–हिमायतनगर सर्कल परिसरातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शेतातील पिके संकटात सापडली असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि खरीप पिकांचे भवितव्य याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत पिकांची सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता, विहिरी-बोअरवेलची परिस्थिती तसेच पशुधनासाठी असलेल्या पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेतला. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके संकटात आली आहेत. जलस्रोत आटत चालल्याने शेतीसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले.


शेतकऱ्यांच्या व्यथा बांधावरच ऐकल्या – पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणी आमदारांसमोर मांडल्या. पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुष्काळी परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी, पाणीटंचाई निवारण आणि पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आ. कदम कोहळीकर यांनी दिल्या.


“कागदावरचा आढावा नको, बांधावरची परिस्थिती पाहा” – दुष्काळाचे संकट केवळ कागदोपत्री आकडेवारीतून समजणार नाही, तर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची आणि जलस्रोतांची स्थिती पाहणे गरजेचे आहे, अशी भूमिका या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाली. शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक मदत व सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा विश्वास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिला.

दरम्यान, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने आता केवळ पाहणीपुरते न थांबता प्रत्यक्ष मदत आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आहेत; आता प्रशासनाची मदतही बांधावर पोहोचणे गरजेचे आहे!




