नांदेड| रेल्वे स्थानके, गाड्या आणि रेल्वे परिसरात स्वच्छता राखण्यासाठी भारतीय रेल्वेने स्वच्छतेसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या कृतींसाठी संबंधित व्यक्तीस ₹१,००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दंडाची रक्कम न भरल्यास प्रकरण सक्षम न्यायालयासमोर मांडले जाऊ शकते आणि न्यायालयाकडून ₹२,००० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.


रेल्वे स्थानके, फलाट, प्रतीक्षालये, रेल्वेगाड्या तसेच रेल्वे रुळांवर कचरा टाकू नये, उपलब्ध कचरापेट्यांचा वापर करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांना केले आहे.



रेल्वे परिसरात जबाबदार वर्तन वाढविणे आणि स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. स्वच्छता मोहिमेदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासोबतच सहप्रवाशांनाही स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “कचरा टाकू नका, कचरापेटीचा वापर करा आणि रेल्वे परिसर स्वच्छ ठेवा,” असे आवाहन करत स्वच्छ रेल्वे–स्वच्छ भारत या संकल्पनेला हातभार लावण्याचे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने केले आहे.




