नांदेड/लोहा, अनिल मादसवार | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोहा शहरात गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ विकसित झाली असून, लोह्यात तयार होणाऱ्या आकर्षक व विविध आकारांच्या गणेशमूर्तींना मराठवाड्यासह कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून मोठी मागणी आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून शहरात गणेशमूर्ती निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून, या व्यवसायातून वर्षभर अनेक मूर्तिकार व कारागिरांना रोजगार मिळत आहे.


दिवाळीनंतर गणेशमूर्ती निर्मितीला सुरुवात केली जाते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक, तेलंगणा तसेच मराठवाड्यातील विविध भागांतील व्यापारी व गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मूर्तींची ठोक खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात लोह्याच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.


लोहा शहरातील पेंटर दत्तात्रय यांच्या रेखीव, आकर्षक आणि विविध भावमुद्रांमधील गणेशमूर्तींना दरवर्षी मोठी मागणी असते. यंदाही विविध रंगछटा, आकर्षक सजावट आणि भावमुद्रांनी साकारलेल्या मूर्ती तयार करण्यात आल्या असून, दूरवरच्या गणेश मंडळांनी आगाऊ बुकिंग केले आहे.




तसेच भगवान सळवणे व त्यांचे बंधू, पलये, जोरुळे बंधू, पिसोळे यांच्यासह शहरातील अनेक मूर्तिकार गणेशमूर्ती निर्मितीत व्यस्त आहेत. या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह असून, वर्षभर मजुरांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.
कर्नाटक-तेलंगणातून ठोक खरेदीदार – लोह्यात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून विविध आकार व मुद्रांमधील गणेशमूर्ती तयार केल्या जातात. दहा ते बारा फुटांपर्यंतच्या मोठ्या मूर्तींसह घरगुती गणेशमूर्तींनाही मागणी आहे. कर्नाटक व तेलंगणा राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर ठोक खरेदीसाठी लोह्यात येतात. त्यामुळे गणेशमूर्ती निर्मिती व विक्री हा शहरातील महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी लोहा शहरातील बाजारपेठेत गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिक व गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
दरम्यान, पूर्वी गणेश चतुर्थीनिमित्तचा बाजार जुन्या भाजी मंडई परिसरात भरत होता. नगरपरिषद प्रशासनाने भाजी मंडई जुन्या रुग्णालयासमोर स्थलांतरित केली आहे. यंदा गणेश चतुर्थी व महालक्ष्मी सणानिमित्त भरणारा बाजार नगरपरिषद कार्यालयासमोर भरविण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

