Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील गणेशोत्सवात डॉल्बीला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका!

नांदेड जिल्ह्यातील गणेशोत्सवात डॉल्बीला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका!

दिनांक ७ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत डॉल्बीवर पूर्ण बंदी; नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

नांदेड, अनिल मादसवार| गणेशोत्सवाच्या जल्लोषात कर्णकर्कश डॉल्बीचा दणदणाट करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. नांदेड जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिमच्या वापरावर थेट बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(१) अन्वये कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

७ सप्टेंबर २०२६च्या मध्यरात्रीपासून ८ नोव्हेंबर २०२६च्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिम वापरण्यास अथवा चालविण्यास मनाई राहणार आहे. डॉल्बी मालक, चालक किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने आदेश झुगारून डॉल्बी वाजविल्यास संबंधितांवर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे.

गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमीसह विविध उत्सवांमध्ये मोठ्या आवाजात डॉल्बी वाजविण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. प्रशासनाने वारंवार नोटिसा देऊन आणि बैठका घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसविल्याचे निदर्शनास आल्याने यंदा प्रशासनाने ‘डॉल्बी बंद’चा कठोर निर्णय घेतला आहे.

डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना त्रास होऊ शकतो. ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉल्बी वाजविण्यावरून वाद, संघर्ष किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आधीच कडक पावले उचलली आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण नियंत्रणासंदर्भातील निर्देशांचेही काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सवाचा उत्साह कायम ठेवताना ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डॉल्बीचा दणदणाट केला तर कारवाईचा ‘दणका’! प्रशासनाचा आदेश मोडून डॉल्बी वाजविणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(१) तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात, मात्र डॉल्बीच्या दणदणाटाशिवाय! शांतता, सुरक्षितता आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात उत्सव साजरा करण्याची जबाबदारी गणेश मंडळे, डॉल्बी चालक-मालक आणि नागरिकांची राहणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments