हिमायतनगर, अनिल मादसवार| हुतात्मा जयवंतराव पाटील कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण व भावस्पर्शी वातावरणात साजरा करण्यात आला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन रणखांब होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कमलाकर कमठे, उपमुख्याध्यापक सुभाष यशवंते व वरिष्ठ लिपीक राघवेंद्र इनामदार उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींनी प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आगळ्या पद्धतीने स्वागत केले. पुष्पवृष्टी, पुष्पगुच्छ तसेच लाल शाईच्या पेनाने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींचे सूत्रसंचालन व फोटोग्राफी, तसेच शिक्षकांसाठी आयोजित संगीत खुर्ची, पिलो पासिंग आणि प्रश्नमंजुषा या उपक्रमांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख भायकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मॅडम व खरोडे सर यांनी केले. विविध स्पर्धांमध्ये संगीत खुर्चीत भायकाटे सर, पिलो पासिंगमध्ये इनामदार सर, तर प्रश्नमंजुषेत सय्यद सर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.



दहीहंडीने प्रशालेत अवतरले गोकुळ – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी उत्सवात प्रशालेच्या प्रांगणात जणू गोकुळच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला. राधा-कृष्णाच्या वेशातील विद्यार्थिनी, गोपिकांची आकर्षक वेशभूषा, गरबा नृत्य आणि मानवी मनोरा यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. अखेरीस विद्यार्थिनींनी उभारलेल्या मानवी मनोऱ्यातून दहीहंडी फोडण्यात आली.

कु. सुरोशे मॅडम, श्रीमती लुटे मॅडम, श्रीमती काळे मॅडम व सांस्कृतिक विभागप्रमुख भायकाटे सर यांच्या मार्गदर्शनातून अवघ्या एका दिवसाच्या सरावात हा उपक्रम साकारण्यात आला. सुमारे ४० विद्यार्थिनींनी विविध वेशभूषेत सहभागी होत दहीहंडी उत्सवाची शोभा वाढवली.
सेवानिवृत्तीपूर्वीचा शेवटचा शिक्षक दिन; हराळे सर भावुक – शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात हराळे सर यांनी हा आपला सेवानिवृत्तीपूर्वीचा शेवटचा शिक्षक दिन असल्याचे सांगत विद्यार्थिनींनी दिलेले प्रेम आणि या सोहळ्याच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतील, अशा भावनिक भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास प्रा. सूर्यप्रकाश जाधव, प्रा. कदम, प्रा. सावंत, सुवर्णकार सर, राठोड सर, अकूलवार सर यांच्यासह प्रशालेतील संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि दहीहंडी उत्सवातून दिसून आलेली एकता, सहकार्य व संस्कार यामुळे प्रशालेतील शिक्षक दिन आणि जन्माष्टमीचा सोहळा संस्मरणीय ठरला.

