नांदेड| “इतर कोणत्याही विषयावर लिहिणे सोपे असते; मात्र वडिलांविषयी लिहिताना शब्द अपुरे पडतात. आठवणी, कृतज्ञता, भावना आणि त्याग यांचे ओझे मनावर दाटून येते. त्यामुळे वडिलांविषयी व्यक्त होणे ही अत्यंत कठीण बाब आहे,” असे भावस्पर्शी प्रतिपादन दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी केले.


स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड यांच्या वतीने संध्याछाया वृद्धाश्रम येथे आयोजित “बाबा तुमच्यासाठी…” या विशेष उपक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे होते. त्यांच्या हस्ते मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.


शंतनू डोईफोडे म्हणाले की, वडील हे केवळ कुटुंबप्रमुख नसतात, तर ते मुलांच्या आयुष्याचे पहिले शिक्षक, मार्गदर्शक आणि व्यक्तिमत्त्व घडवणारे शिल्पकार असतात. सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मागे त्यांच्या वडिलांचे संस्कार आणि त्याग मोठ्या प्रमाणावर असतात. माझे वडीलही सार्वजनिक जीवनात सक्रिय होते आणि त्यांच्याकडूनच मला जीवनमूल्यांचा वारसा मिळाला, असे त्यांनी सांगितले.



आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, “मी लहान असताना माझे सर्व लाड पुरविण्यात आले; परंतु दैनिक प्रजावाणीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझी खरी परीक्षा सुरू झाली. दररोज सकाळी वर्तमानपत्रातील प्रत्येक बातमी, प्रत्येक मथळा, प्रत्येक निर्णय याबाबत वडील प्रश्न विचारायचे. काय योग्य झाले, काय चुकले, काय टाळायला हवे होते, याचा कठोर परामर्श ते घेत असत. त्या दैनंदिन परीक्षांनीच मला पत्रकारितेची शिस्त, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी शिकवली.”
यावेळी त्यांनी मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तथा दैनिक प्रजावाणीचे संस्थापक संपादक स्वर्गीय सुधाकररावजी डोईफोडे यांच्या कार्याचा कृतज्ञतेने उल्लेख केला. त्यांच्या सान्निध्यात घडलेल्या पत्रकारितेच्या प्रवासातील आठवणी त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.
“बाबा तुमच्यासाठी…” या संकल्पनेचा संदर्भ देताना शंतनू डोईफोडे यांनी सांगितले की, वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. त्यांनी दैनिक प्रजावाणीचे बिलोली येथील वार्ताहर गोविंद मुंडकर यांचा विशेष उल्लेख करत, वडिलांविषयी असलेली त्यांची आत्मीयता आणि आदरभाव कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आपल्या दोन्ही मुलींना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी जबाबदार पित्याची भूमिका समर्थपणे निभावल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटक म्हणून बोलताना आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वृद्धाश्रमांची संकल्पना, बदलती कौटुंबिक व्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी यावर भाष्य केले. आदर्श कुटुंबव्यवस्थेमुळे वृद्धाश्रमांची गरज कमी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आजच्या सामाजिक वास्तवात काही ठिकाणी वृद्धाश्रमांची आवश्यकता नाकारता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि संवेदनशीलतेने सांभाळ करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपीय भाषण सुरेखा पाटणी यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी “शब्दोत्सव” अंतर्गत वैजनाथराव मेघनाळे आणि बसवराज वडिले यांचा गौरव करण्यात आला. तसेच “स्वरोत्सव” अंतर्गत प्रसिद्ध गायक प्रदीप सोनटक्के व त्यांच्या संचातील महिला कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवदास हमंद यांनी केले, तर आभार अभियंता साहेबराव जाधव यांनी मानले. “बाबा तुमच्यासाठी…” या उपक्रमामुळे वडिलांविषयीची कृतज्ञता, कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचला.

