Thursday, June 25

सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवरील अन्याय थांबवावा

 ग्रामविकास मंत्र्यांकडे शिक्षक परिषदेची मागणी
मुंबई| राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदांच्या पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांनी केला आहे. या संदर्भात शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पदोन्नती प्रक्रिया राबविताना ग्रामविकास विभागाशी आवश्यक समन्वय साधला गेला नसल्याचा दावा करत संबंधित पत्राला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच पदोन्नती समितीच्या बैठकीच्या अंतिम दिनांकापर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांची ज्येष्ठता ग्राह्य धरून पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.

यावेळी विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदासाठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रक्रियेतील काही त्रुटींकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही काही CTET पात्र उमेदवारांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा मुद्दा शिक्षक परिषदेने उपस्थित केला.

शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींनी पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या तारखेपर्यंत आवश्यक पात्रता प्राप्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता विचारात घेणे हे प्रशासनाच्या दृष्टीने अधिक न्याय्य ठरेल, असे मत व्यक्त केले. कृत्रिम ‘कट-ऑफ डेट’ निश्चित करून पात्र शिक्षकांना डावलले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. पदोन्नती प्रक्रियेशी संबंधित अधिसूचना व अन्य बाबींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अन्यायग्रस्त सेवाज्येष्ठ शिक्षक तसेच गुणवत्ता यादीत स्थान मिळूनही पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शिक्षक परिषदेने व्यक्त केला आहे.

या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) चे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, कोकण विभागीय अध्यक्ष गणेश पोतदार, ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी आदींचा समावेश होता. ही माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!