नवीन नांदेड| शहरातील सिडको परिसरातील रामनगर येथे असलेल्या श्री राम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन 19 मार्च ते 27 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. मंदिर संस्थानचे हे ३५वे वर्ष असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या सोहळ्यात दररोज सकाळी 6 ते 8.30 या वेळेत श्रीरामाचा पवमान अभिषेक, आरती व नित्यपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 19 ते 25 मार्चदरम्यान दररोज दुपारी 2.30 ते 6 वाजेपर्यंत ह.भ.प. प्रणव जनार्दन पटवारी (माजलगाव, जि. बीड) यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्रीरामकथा सादर होणार आहे. या रामकथेला तबल्यावर संजय देशपांडे आणि संवादिनीवर अर्जुन गुंडाळे साथ देणार आहेत.

या उत्सवाच्या निमित्ताने 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रुद्र स्वाहाकार महायज्ञ (पौराहित्य : सुशीलगुरु कुलकर्णी) आयोजित करण्यात आला आहे. 26 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 श्री रामजन्म कीर्तन (श्री रामकृष्ण गोविंदराव जामकर) होणार असून त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रीरामजन्म उत्सव, पाळणा व महाआरती होईल. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता श्रीरामाची भव्य शोभायात्रा मंदिर ते शिवाजी चौक असा मार्गाने काढण्यात येणार आहे.


27 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत लक्ष्मीकांत रवंदे यांच्या संगीत विद्यालयातर्फे ‘रामधुन’ हा भक्तीसंगीतावर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत श्रीरामाची आरती व महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.

या वर्षीच्या सोहळ्यात कवी, लेखक व प्रवचनकार ह.भ.प. प्रणव जनार्दन पटवारी यांच्या अमृतवाणीतून श्रीरामकथा ऐकण्याची संधी रामभक्तांना मिळणार आहे. संत साहित्य, शिवचरित्र व ऐतिहासिक विषयांवरील त्यांच्या प्रभावी प्रवचनांमुळे ते राज्यभर सुप्रसिद्ध आहेत. श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने आणि सर्व रामभक्तांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री राम मंदिर संस्थान, रामनगर सिडको नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.



