नांदेड l राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठीच्या गत तिन वर्षापासून रखडलेल्या नांदेड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण करण्यात आले आहे.बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) यांच्या लढ्याला यश आले असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांचीही या समितीत अशासकीय सदस्यपदी वर्णी लागली आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी नामनिर्देशित केल्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठीच्या १६ सदस्यीय जिल्हास्तरीय समितीत ९ कलावंत व १ साहित्यिक यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र दि.२ मार्च रोजी काढले आहे.


या समितीचे अध्यक्ष म्हणून स्वतः जिल्हाधिकारी तर,सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे आहेत.सदस्यपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,नांदेड-वाघाळा मनपाचे उपायुक्त,छत्रपती संभाजीनगर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालक,जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी या शासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्य म्हणून कलाकार गुरुनाथ पेंढारकर मुखेड,विठ्ठल मोगलाजी नावाडे बिलोली,बळीराम दिगांबर जाधव नायगांव, बाबाराव माधवराव थोटे कुरुळा कंधार, ह.भ.प.व्यंकटी तातेराव जाधव मुदखेड, त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे हिमायतनगर, ह.भ.प.व्यंकटराव मुकींदराव चेपूरवार हदगांव, बालाजी बुद्धाजीराव पाटील लोहा,सुनील व्यवहारे किनवट तसेच,साहित्यिक म्हणून बाबुराव पाटील भोकर यांचीही अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


महत्वपूर्ण बाब म्हणजे,मान्यवर वृद्ध कलावंत व साहित्यीक मानधनांचे सन् २०२३-२४ या वर्षातील प्रस्ताव जिल्हास्तरीय समिती पूनर्गठन नसल्याने रखडल्यानंतर,शासन परिपत्रकानुसार समिती नामकरणासह काही बदल करण्यात आले.त्यानुसारचीही राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित नसल्याने सन् २०२३-२४ व २०२४-२५ व २०२५-२६ या तिन वर्षाचे अर्ज व प्रस्ताव शासनाकडून मागविण्यात आलेले असले तरिही त्यांची छाननी करुन पात्र ठरविण्यात आले नाहीत.यासाठीच्या समितीचे पूनर्गठन नसल्यानेच त्याबाबतची कार्यवाही थांबली होती.

परिणामी आर्थिक मदतीविना लाभार्थींची परवड होत असल्याची बाब जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून द्यावी व सदरची समिती पूनर्गठनाला पाठपुरावा करावा यासाठी बहुजन टायगर युवा फोर्स च्यावतिने समितीच्या सदस्या तथा,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री ना.अतुल सावे यांनाही अनेकदा भेटून पाठपुरावा केला होता.
तसेच,समिती पूनर्गठनासाठी जिल्हा परिषदेसमोर संघटनेच्यावतीने अनेकदा भजन आंदोलनेही केली होती.बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र व सांस्कृतिक विभागाच्या या लढ्याला यश आलेले असून या समितीत अशासकीय सदस्य म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांचाही समावेश झाल्याने त्यांच्या कर्तव्यतत्परतेला बळ मिळाले असून संघटना व जिल्हाभरात लोकपारंपारिक कलावंताचा आनंद द्विगुणित झाल्याचे संघटनेचे प्रवक्ते लक्ष्मणराव मा.भवरे,शाहीर बापूराव जमधाडे,रवीराज भद्रे म्हणाले.
…
आमचा लढा सुरुच राहिल. – भवरे.
भारतीय संस्कृतीत लोकपारंपारिक कला जीवंत ठेवण्यासाठीच कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य कलावंत करित असतात.त्यांना शासनाकडून देण्यात येत असलेली आर्थिक मदत वाढविण्यासह मान्यवर वृद्ध कलावंत,साहित्यिकांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून गत अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पुर्णत्वासह राज्यातील रखडलेल्या अनेक जिल्हास्तरीय समितींच्या पूनर्गठनासाठी आगामी काळात आंदोलनात्मक भूमिका घेत यापूढेही प्रसंगी आक्रमकपणे रस्त्यावर उतरुन संघर्ष करु असे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे म्हणाले.
नांदेड जिल्हास्तरीय समिती पूनर्गठित झाल्याने लवकरच गत तिन वर्षातील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागतील असा आशावाद व्यक्त करुन या समितीच्या सदस्यपदी आपली नियुक्ती केल्याने पालकमंत्री ना.अतुल सावे,जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार-आमदार व महायुती-महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचेही ॠणी असल्याचे ते म्हणाले.

