Friday, June 26

Sardar Vallabhbhai Patel ; सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कारेगाव फाटा दुर्दशा प्रकरण

नांदेड l सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कारेगाव फाटा येथिल पुर्णाकृती पुतळ्याची सत्ताधाऱ्यांकडून दुर्दशा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलनात्मक भूमिका घेतल्यानंतर नांदेडचे खा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी या प्रकरणात स्वतःच दखल घेऊन उपविभागीय अधिकारी यांना तातडीने योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुर्णाकृती पुतळा आहे.ग्रामीण भागात त्यांच्या एकमेव असलेल्या या पुर्णाकृती पुतळा दुर्दशेबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकांऱ्यासह त्याठिकाणी दि.९ ऑगस्ट रोजी गेले होते तसेच,सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनासह आंदोलनात्मक भूमिका घेतली. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या या पुतळा दुर्दशेबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनापर्यत दखल घ्यावी अन्यथा येत्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी दि.१७ सप्टेंबर रोजीपासून पुतळ्यासमोरच आमरण उपोषणासह रास्ता रोको करुन पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी भिक मांगो आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता.

दरम्यान,नांदेडचे खा.रविंद्र चव्हाण यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनी दि.१५ ऑगस्ट रोजी कारेगाव फाटा येथे जाऊन सरदार पटेल यांच्या पुतळयास अभिवादन करुन या परिसराची पहाणी केली व उपविभागीय अधिकारी यांना पुतळा दुरुस्ती आणि सुशोभीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांना तातडीने प्रस्ताव दाखल करुन याबाबतचा पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे,सरदार पटेल यांच्या पुतळा दुर्दशेबाबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आंदोलनात्मक भूमिकेनंतर काँग्रेसचे खा.रवींद्र चव्हाण यांनी स्वतः कारेगाव फाटा येथे जाऊन दखल घेतली असली तरिही सरदार पटेलांची महती गत काही वर्षात आळवणारे सत्ताधारी भाजपाचे जिल्ह्यात पालकमंत्री तसेच, दोन राज्यसभा खासदार एवढेच नव्हे तर,नायगांव विधानसभेच्या आमदार असतांना त्यांनी आजपावेतो या प्रकरणात लक्ष दिल्याचे दिसून येत नसल्याने त्यांच्या ‘या’ कार्य-कर्तत्वाची जिल्ह्यात ‘चांगलीच’ चर्चा रंगली आहे.

तर आम्ही आंदोलनावर ठामच – राष्ट्रवादी
सरदार पटेल यांच्या पुतळ्याची सत्ताधाऱ्यांकडून केवळ दुर्दशाच नव्हे तर, विटंबनाच होत असून पुतळा दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने देखावा नव्हे तर,कृतीतून कर्तव्यतत्पर व्हावे अन्यथा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापासूनच्या आंदोलनावर आम्ही ठामच असून लवकरच याबाबत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे लक्ष्मण भवरे,पांडुरंग शिंदे यांनी दिली. तसेच,खा.रवींद्र चव्हाण यांनी स्वतःच कारेगाव फाटा येथे जाऊन सरदार पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पुतळा दुरुस्ती व सुशोभीकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याने त्यांचे आभार व्यक्त करतांनाच यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा अपेक्षीत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!