नांदेड| नांदेड लोकसभा मतदार सांघाचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना सुरूवातीला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यांच्यावर हैद्राबाद किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. हैद्राबाद येथिल किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सम्पूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्यात सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्या वसंत चव्हाण यांचे नाव घेतले जाते.
भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला.
वसंतरावजी चव्हाण… pic.twitter.com/DTGRe8p5hm
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 26, 2024
काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दर महिन्याच्या १० तारखेला ते डायलसिस करतात. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमले नाही. थोडे प्रकृतीकडेही दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तातडीने नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली. मात्र कोणताही धोका न पत्करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांनी हैद्राबाद येथिल किम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे नांदेडच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.