नांदेड l स्व. दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसच्या वतीने (ता. मंठा जि. जालना) अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात. पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त हेलस कथामाला शाखा आणि जालना येथील मानस फाऊंडेशनच्या सहकार्याने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागासाठी प्रेरित करावे. स्पर्धा यशस्वितेसाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मनपा ) व्यंकटेश चौधरी यांनी केले आहे. स्पर्धेचे स्वरूप, नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. प्रवेश फी नाही, स्पर्धा मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
स्पर्धा बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी व किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात आहे. कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे, कथा आठ ते दहा मिनिटांची असावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा नियोजनात ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार संयोजन समितीकडे असेल.
पारितोषिके व सन्मान याप्रमाणे आहे.
जिल्हास्तर : प्रथम , व्दितीय व तृतीय पारितोषिक : प्रमाणपत्र व ग्रंथ भेट असे स्वरूप असेल. तर विभागीय स्तर पारितोषिक : बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. प्रथम : रोख दीड हजार रुपये, द्वितीय : रोख एक हजार रुपये, तृतीय : पाचशे रुपये. उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख : दि.११ डिसेंबर २०२४, बुधवार अशी असून स्पर्धेत सहभागासाठी https://forms.gle/AjUgULXkpo3m4fxK6 या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक १४ डिसेंबर २०२४, शनिवार रोजी नांदेड येथे तर विभागस्तरीय स्पर्धा २४ डिसेंबर २०२४, मंगळवार रोजी होणार आहे.
तरी स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा संयोजक व्यंकटेश चौधरी (9405821900), पद्माकर कुलकर्णी (9422187942), विलास कोळनूरकर
(9420448019) यांनी केले आहे. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेचे स्थळ नोंदणी केलेल्या स्पर्धकांना कळविण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.