हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL

0

हिमायतनगर| तालुक्यात चांगल्या प्रकारे पाऊस बरसल्याने खरिपाच्या पेरणीला आता वेग आला आहे. जवळपास ७०% पेरण्या पुर्णत्वास आल्या असून, उर्वरित पेरण्या करण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. या वर्षी ३९ हजार ६४४ हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार आहे. यात नगदी पिक सोयाबीनचा पेरा एक नंबर राहणार असून, कपाशी दोन नंबर वर राहणार आहे. तालुक्यातील काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यानी सुरुवातीला केलेली पेरणी धोक्यात आली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार ६७८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून पेरणीयोग्य क्षेत्र ३९ हजार ८७० हेक्टर आहे. गेल्या खरिप हंगामात ३९ हजार ६४४ हेक्टर वर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी सर्वाधिक १९ हजार ८५७ हेक्टर वर नगदी पिक सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. तर कपाशीची लागवड १४ हजार २२४ हेक्टर वर करण्यात आली होती. यावर्षी देखील सोयाबीन एक नंबर वर राहणार असून, कपाशीचा पेरा घटला आहे. तालुक्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, हाळद, आदी पिकांचा पेरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील हिमायतनगर मंडळात सर्वाधिक पेरा सोयाबीन तर सरसम महसूली मंडळात कापूस व सोयाबीन ही पिक बरोबरीचा पेरा राहणार आहे.

तर जवळगाव महसूल मंडळात सोयाबीन चा पेरा घटणार असून कपाशीची लागवड सर्वाधिक प्रमाणात राहणार आहे. जवळगाव वर्तुळात टाकराळा, मानसिंग तांडा, दरेगाव, दाबदरी, सोनारी, वाई, वायवाडी, पोटा बु. पोटा खू., बळीराम तांडा, दुधड, वाळकेवाडी, कोतलवाडी, दरेसरसम, पवना, वाशी, एकघरी, महादापूर, ही गावे डोंगराळ भागात असल्याने या भागात कपाशीची लागवड करण्यात आली असून जवळपास ६०% कपाशीची लागवड पुर्ण झाली आहे. तर उर्वरित ४० % कपाशीची लागवड बाकी असून कापूस लागवड करणे चालू आहे.

तसेच पैनगंगा नदीकाठावरील कामारी, दिघी, वाघी, पळसपूर , डोल्हारी, सिरपल्ली, वारंगटाकळी, मंगरूळ, एकंबा सिरंजनी, सरसम, जवळगाव,खैरगाव, कामारवाडी, आदींसह या भागातील शेतकरी हे नगदी पिक सोयाबीन ला महत्व देतात, कारण सोयाबीन नंतर हरभरा व इतर रब्बी हंगामातील पिके घेता येतात. म्हणून सोयाबीन ला प्रथम प्राधान्य देतात. तर उर्वरित भागात कापूस, तुर व इतर पिके घेतली जातात. सद्यस्थितीत या भागात चांगल्या प्रकारे पाऊस कोसळत आहे. परंतू अद्यापपर्यंत दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला असल्याने खरीपाच्या पेरणीला आता वेगाने सुरुवात झाली असून जवळपास ७०% पेरण्या पुर्णत्वास आल्या असून उर्वरित ३०% , खरिपाच्या पेरणीला आता वेग आला आहे. मात्र सुरुवातीच्या पावसाच्या भरवश्यावर ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here