नांदेड। म्हणतातना लढणारे माणसं हे जिवंत असल्याची नोंद होते, नाहीतर मुर्दाड बॉयलर कोंबड्यात आणि अन्याय सहन करणाऱ्यात फारसा फरक नसतो. गोष्ट आहे नांदेड जवळील शेनी पोस्ट देळूब ता.अर्धापूर येथील.
ऋतुराज संजय हातागळे या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा २० एप्रिल २०२४ रोजी चोरंबा- निमगाव कॅनॉल मध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
पोलीस ठाणे अर्धापूर येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती व पार्थिवास अग्नी देऊन अंत्यविधी उरकण्यात आला होता. परंतु मयताची आई सुनीता हातागळे यांना आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा पूर्ण संशय होता. तशी तक्रार सुनिता आणि संजय हातागळे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात देण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु निमगाव आरोग्य उप केंद्राच्या डॉक्टरांनी व्हेन्स मध्ये पाणी जाऊन मृत्यू झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट लिहले होते.
पोलिसांनी देखील रिस्क न घेता मयताच्या आईचे म्हणणे हलक्यातच घेतले आणि गुन्हा दाखल होऊच शकत नाही असे स्पष्ट सांगितले. ऋतुराजचे आई-वडील हताश होऊन न्यायाच्या परीक्षेत होते आणि त्यांनी लढा सुरूच ठेवला. अशातच त्यांना सीटू कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा सल्ला काही नातेवाईकांनी दिला.संजय हे गावातच सालगडी म्हणून काम करायचे तर सुनीता ह्या लागेल ती मजुरी करायच्या. त्यांनी सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड व इतर कार्यकर्त्यांची भेट घेतली. सीटू च्या प्रमुख कार्यकर्त्यांची टीम शेनी येथे गेली व प्रत्यक्षात पीडितांच्या सर्व नातेवाईकांना तसेच गावातील अनेकांना भेटून विचारपूस केली.
मयताच्या मानेवर आणि इतर ठिकाणी जखमा दिसत होत्या असे गावातील लोकांनी सांगितले. दि.२० मे रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांना रीतसर निवेदन देऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आई वडील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले तर त्या उपोषणास पाठिंबा म्हणून सीटू कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले.
संशयित हे हातागळे यांच्या जवळचे नातेवाईक असल्यामुळे तक्रार मागे घेण्यासाठी अनेकांचा दबाव होता. निमगाव चोरंबा खंडोबाच्या यात्रेतील पालखीत घात होईल असे ऋतुराज आणि त्याच्या आई वडिलांना स्वपनात देखील वाटले नसावे.परंतु २० मे रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान त्याच्या जवळच्या सोमवार पेठ वसमत जि.हिंगोली येथील नातेवाईकांच्या तीन मुलांनी त्याला मोटार सायकल वर नेले आणि उर्धव पेनगंगा पकल्पाच्या कालव्यात उतरविले.
त्या कालव्यात दहा ते बारा फूट पाणी असते आणि त्याचा प्रवाह देखील खुपच गतिमान असतो. त्यातच ऋतुराजचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ऋतुराज हा होतकरू आणि हुशार विद्यार्थी होता.तो १२ वीच्या परीक्षेत मध्ये तो चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याला सैनिक होयाचे होते परंतु दुर्दैव त्याचा निकाल तो पाहू शकला नाही कारण त्याचा अगोदरच खून झाला होता. पीडित आई वडिलांनी नऊ दिवस जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास केले, दोघांच्याही तब्येती खालवल्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सोबत सीटूच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषण सोडा चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले परंतु उपोषण सोडण्यास दोघेही तयार होईनात.
शेवटी त्यांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणात बदल करून साखळी उपोषणाचा पर्याय सुचविला तो पर्याय त्यांनी मान्य केला आणि २७ मे पासून साखळी उपोषणपासून सुरु केले. आमरण आणि साखळी उपोषण चार ते सहा महिने चालले. शोध लागत नसल्याने व पुरावे मिळत नसल्याने पेच वाढतच होता. परिस्थितीजन्य पुरावे अर्धापर पोलीस माणण्यास तयार नव्हते.अर्धापूरचे डिवायएसपी, पोलीस निरीक्षक आदींची वेळोवेळी भेट घेतली परंतु फारसा उपयोग झाला नाही.
सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली परंतु धागेदोरे जुळत नव्हते. नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांना पदोन्नती पर पोलीस अधीक्षक पदभार मिळाला. तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे हिंगोलीला गेले आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली सातत्याने आठ महिने पाठपुरावा केला आणि दि.२ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी प्रशांत आनंदा खंडागळे, जीवन चांदु लोखंडे व सोमेश जोगदंड या तिघांवर पोलीस ठाणे अर्धापूर येथे गुरनं ०६३२ भादंसं १८६० कलम ३०४,३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तिन्ही आरोपीना तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री सुरेश भगवानराव भोसले हे करीत आहेत.
मयत ऋतुराज चे आई वडील प्रचंड दबावाखाली असून त्यांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून कार्यकर्त्यांच्या व आमच्या जीवाला धोका आहे त्यांचा बंदोबस्त करावा या आशयाचे निवेदन पोलीस अधीक्षक श्री अबीनाश कुमार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री अभिजीत राऊत यांना दिले आहे. अखेर रनरागिणी बाई लढली आणि केवळ धाडसाने बाई जिंकली असेच म्हणावे लागेल.