हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा नगरीतील ऐतिहासिक श्री परमेश्वर मंदिर यात्रेत रंगलेली भव्य शंकर पट स्पर्धा यंदा जल्लोष, थरार आणि विक्रमी सहभागामुळे विशेष ठरली. परंपरा, प्रतिष्ठा आणि पराक्रमाचा संगम असलेल्या या सोहळ्याने सलग तिसऱ्या वर्षी “न भूतो न भविष्यती” अशी छाप उमटवत संपूर्ण तालुक्याला रोमांचित केले.

स्पर्धेच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते शर्यतींचा शानदार शुभारंभ झाला. यावेळी नायब तहसीलदार श्री. पठाण, मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी आनंता देवकते तसेच शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्यामसुंदर पाटील, कोशाध्यक्ष प्रवीण शिंदे, सहसचिव गजानन हार्डपकर, नारायण माने आदीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सकाळी दहापासूनच पटाच्या मैदानावर प्रेक्षकांचा अक्षरशः महासागर उसळला होता. धुळीचे लोट उडवत झंझावाती वेगाने धावणाऱ्या बैलजोड्यांनी प्रत्येक फेरीत अंगावर शहारे आणणारा थरार निर्माण केला. टाळ्यांचा कडकडाट, ढोल-ताशांचा गजर आणि विजेत्यांच्या स्वागतासाठी उडणारी आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला.


यंदा विदर्भ, मराठवाडा तसेच परराज्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तब्बल ३०० हून अधिक बैलजोड्या धावपट्टीवर उतरल्याने स्पर्धेचा दर्जा अधिक उंचावला. प्रत्येक धावीनंतर प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मैदान दणाणून गेले. यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण ५ लाख रुपयांची भव्य बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, स्पर्धा दोन गटांत पार पडली आहे .


पहिला गटातून प्रथम येणाऱ्या बैलजोडीस – ₹७१,०००, द्वितीय क्रमांकाच्या जोडीस – ₹५१,०००, तृतीय क्रमांकाच्या जोडीस – ₹३१,००० यासह अन्य १२ बक्षिसे ठेवली आहेत. तर दुसरा गटातून प्रथम येणाऱ्या बैलजोडीस – ₹४१,०००, द्वितीय येणाऱ्या जोडीस – ₹३१,००० आणि तृतीय क्रमांकास – ₹१७,७७७ रुपयाचे बक्षीस याव्यतिरिक्त अन्य १६ बक्षिसे ठेवली आहेत.

ही स्पर्धा केवळ शर्यत नव्हती हा होता शेतकऱ्यांच्या अभिमानाचा, ग्रामीण संस्कृतीच्या वैभवाचा आणि परंपरेच्या जतनाचा भव्य उत्सव. शिस्तबद्ध नियोजन, स्वयंसेवकांची अथक मेहनत आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
पुढील वर्षी अधिक व्यापक नियोजन, आकर्षक बक्षिसे आणि आधुनिक सुरक्षाव्यवस्थेसह स्पर्धा आणखी भव्य करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. हिमायतनगरच्या पटावर रंगलेला हा थरार अनेक वर्षे सर्वांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही!

