हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या योजनांमुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे विरोधक मतांच विभाजन करून निवडणूक जिकंण्यासाठी विविध प्रकार अवलंबवित आहेत. विधानसभा निवडणुकीत २४ उमेदवार उभे आहेत, त्यापैकी काही उमेदवारांना रसद पुरवून जातीपातीचे विष पेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या या भुलथापाला भीक न घालता एक प्रामाणिक सरळ, सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने काम करणारा शेतकरी पुत्र उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवा. असे आवाहन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केले.
ते गुरुवार दि.14 रोजी रात्रीला हिमायतनगर शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संपन्न झालेल्या सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी प्रचार सभेच्या मंचावर महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, प्रताप देशमुख सरसमकर, विकास पाटील देवसरकर, जीवन आडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे, मुख्तार भाई, यांच्यासह महायुतीचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आर.पी. आय (आ), पिपल्स रिपब्लिकन पक्ष (क), लहुजी शक्ती सेना सह घटक पक्षाचे पदाधिकारी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेपूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वागत समारंभ संपन्न झाला. तसेच अनेक मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी पुढे बोलताना माजी खासदार सुभाष वानखेडे म्हणाले कि, गेल्या १० वर्षापासून आमदारकी उपभोगनाऱ्या उमेदवाराने आत्तापर्यंत विधानसभेत एकही प्रश्न उपस्थित केला नाही. हिमायतनगर शहरासह तालुक्यात मटका, गुटखा, जुगाऱ्यांना पाठीशी घातले. विविध योजना मंजूर करून आणल्या मात्र यातही मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याने कामाचा दर्जा ढासळला, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट ठेऊन कोट्यवधींच्या रस्त्याची वाट लावून शासनाकडून उपलब्ध विकास योजनेचा बट्याबोळ केला आहे. एव्हढेच नाहीतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्लॉट विकून सर्व पैसे गडप केला आहे. अनेक विकास कामाच्या नावाखाली आलेल्या निधीची वाट लावली असून, नांदेड, मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोट्यवधींचे बंगले बांधली आहेत. यासाठी पैसा कुठून आला याचा थोडा विचार करा बांधवानो. अशी निष्क्रिय आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करून सत्तेची फळे उपभोगणाऱ्या लोकांना घराकडे पाठविण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी जातीभेद केला नाही, राबविण्यात आलेल्या शासकीय योजनेतून सर्वाना सारखा लाभ देण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यातील ४ हजार मुस्लिम बहिणींनामोठी मदत मिळवून दिली आहे. त्यांनी कोणताही जातिभेद केला नाही आणि हे महाविकास आघाडीचे लोक जातीभेदाचे राजकारण करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी माझ्या सर्व बहिणींनी व घराघरातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावत येणाऱ्या २० तारखेला बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहनही सुभाष वानखेडे यांनी केले. यावेळी युवासेना अल्पसंख्यांक हिमायतनगर तालुकाध्यक्ष अफरोज शेख यांच्या माध्यमातून बाबुराव कदम कोहळीकर यांच्या कार्यावर प्रभावित होऊन हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १० मधील अनेक मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेचा धनुष्यबाण निशाणी असलेली भगवी दस्ती परिधान करून प्रवेश केला. या सभेला हजारोच्या संख्येने हिंदू – मुस्लिम मतदार, कार्यकर्ते उपस्थित होते.