अर्धापूर| जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात 31 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर मागील 72 तासापासून कायम असल्यामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना महापूर आला आहे. गावाला शहराशी जोडणारे प्रमुख रस्त्यावरचे नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील शेलगाव बुद्रुक, शेलगाव खुर्द, सांगवी, भोगाव, देळुब खुर्द, या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. आजही शेलगाव या गावचा संपर्क तुटलेलाच आहे. अनेक गावातील शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते तर नदीकाठचे शेतीतले पिके कापूस, सोयाबीन, मूग, हळद, ऊस, केळी व पालेभाज्या हे पिके खरडून गेली. मागील 72 तासापासून पिकात पाणी असल्यामुळे पिके सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांचा निर्माण झाली.
यावर्षी सोयाबीन व इतर पिकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येत होती परंतु या तीन दिवसाच्या पावसाने होते त्याचे नव्हते केले म्हणून या भागातील शेतीच्या नुकसानीचे सर्वे ड्रोन कॅमेरा व गुगलद्वारे करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी करत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बुद्रुक व खुर्द. या गावाच्या नदीपर्यंत जाऊन पूर परिस्थिती पाहणी केली. नवी आबादी शेलगाव येथील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. यानंतर मेंढला खुर्द-बुद्रुक, खडकी, सांगवी, गणपुर, कोंढा, देळुब खुर्द, भोगाव या गावातील पूर परिस्थितीची पाहणी करून या पूर परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल माहिती जाणून घेतली.
सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या त्यांच्यासोबत भाजप युवानेत्या श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती होती. तसेच विभागीय अधिकारी , तहसीलदार रेणुकादास देवणीकर महसूल व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह माजी सभापती किशोर स्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, बालाजी पाटील गव्हाणे, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, राजू शेटे, व्यंकटी राऊत, संचालक मोतीराम पाटील जगताप, नगरसेवक बाबुराव लंगडे, बालाजी कदम, यशवंतराव राजेगोरे, सोनाजीराव सरोदे, डॉ.विशाल लंगडे, राजू पाटील कल्याणकर, चंद्रमुणी लोणे, शंकरराव ढगे यांच्यासह वेगवेगळ्या गावातील पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.